आंबेगाव बुद्रुक दुर्घटना : अटक केलेल्या दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी

पुणे – आंबेगाव बुद्रुक परिसरातील वेणूताई चव्हाण तंत्रनिकेतनची सीमा भिंत कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणात अटक केलेल्या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. सत्यमेव रामराज चौहान (वय 47) आणि त्याचा मुलगा दिवाकर (वय 24, बालाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणात जागेचे विकसक, सिंहगड इस्निट्युटचे सौ वेणूताई चव्हाण तंत्रनिकेतन कॉलेज, आंबेगाब बुद्रुकचे व्यवस्थापक आणि बांधकाम विभागाचे कामकाज पाहणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

1 जुलै रोजी रात्री 11.40 च्या सुमारास झालेल्या घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. तर दोनजण गंभीररित्या आणि आठजण किरकोळ जखमी झाले होते. दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघांचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून आले आहे.

बांधकामासाठी झालेले करारनामे जप्त करण्यासाठी आणि गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे. याचा तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. यास बचाव पक्षातर्फे ऍड. विवेक भरगुडे, ऍड. कुमार पायगुडे आणि राकेश ओझा यांनी विरोध केला. सत्यमेव हे कामगार ठेकेदार नाहीत. त्यांनी मध्यस्थी करून केवळ बांधकाम व्यावसायिकाला कामगार पुरविले आहेत. त्यांचा मुलगा दिवाकर हा उबेरमध्ये कामाला आहे. दोघांना विनाकारण गुन्ह्यात अडकाविण्यात आले असल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here