विजेंदर सिंगचे पदार्पण लांबणीवर

नवी दिल्ली – भारताचा अव्वल बॉक्‍सर विजेंदर सिंगचे अमेरिकेतील व्यावसायिक बॉक्‍सिंगमध्ये होणारे पदार्पण लांबणीवर पडले आहे. विजेंदर सिंग 12 एप्रिल रोजी अमेरिकेच्या व्यवसायीक बॉक्‍सिंग क्षेत्रात पदार्पण करणार होता. त्यासाठी लॉस एंजेलिस येथे सराव करत असताना त्याला दुखापत झाल्यामुळे त्याला पदार्पणासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भारताचा बॉक्‍सिंगमधील पहिला ऑलिम्पिक आणि जागतिक पदकविजेता खेळाडू असलेला विजेंदर अमेरिकन व्यावसायिक बॉक्‍सिंगमध्ये लवकरच पदार्पण करण्याच्या तयारीत होता. आठ फेऱ्यांचा समावेश असलेल्या या लढतीत विजेंदरचा प्रतिस्पर्धी खेळाडू कोण असणार याची घोषणा झाली नव्हती.

व्यावसायिक बॉक्‍सिंगकडे वळलेल्या विजेंदरने गेल्या 10 लढतींत अपराजित्व राखले असून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर वेल्टरवेट गटाचे विजेतेपद पटकावले आहे. यावेळी बोलताना विजेंदर दुखापती विषयी सांगताना म्हणाला की, माझ्या डोळ्यावर अजाणतेपणाने ठोसा मारणाऱ्या युवा खेळाडूवर माझे प्रशिक्षक फ्रेडी रोच चांगलेच रागावले. दुखापती हा खेळाचाच भाग असून मी लवकरात लवकर सज्ज होण्याचा प्रयत्न करणार आहे.

विजेंदर सध्या “द वाइल्ड कार्ड बॉक्‍सिंग क्‍लब’मध्ये रोच यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. 32 वर्षांच्या प्रशिक्षकपदाच्या कालखंडात रोच यांनी अनेक प्रतिभावान बॉक्‍सर घडवले असून ते सर्वोत्तम प्रशिक्षकांमध्ये गणले जातात. रोच यांनी माइक टायसन, मॅनी पॅक्वियाओ, मिग्यूएल कोट्टो आणि ऑस्कर जे ला होया यांसारख्या महान बॉक्‍सर्सना मार्गदर्शन केले आहे.

“”शुक्रवारी सराव करताना मला दुखापतीला सामोरे जावे लागले. माझ्या डाव्या डोळ्याला दोन टाके पडले असून डॉक्‍टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, आता दुखापत बरी झाल्यानंतरच मला पुढील लढतीविषयीची माहिती मिळणार आहे.”                                                                                                                          -विजेंदर सिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)