आयुष्यात किमान पाच झाडे लावावीत व जगवावीत – प्रकाश जावडेकर

महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण कार्यक्रम; मंत्री व खासदारांचा सहभाग

नवी दिल्ली : प्रत्येकाची वैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी आयुष्यात किमान पाच झाडे लावावी व जगवावी, असे आवाहन केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे वृक्षारोपण कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र शासनाच्या ‘वनमहोत्सव मोहिम-2019’ अंतर्गत आज येथील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनामधे महाराष्ट्र सदन व नवी दिल्ली नगरपालिका परिषदेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार सर्वश्री डॉ.जयसिद्धेश्वर स्वामी, मनोज कोटक, इम्तियाज जलील, संजय मंडलिक, धैर्यशिल माने, ओमप्रकाश पवन राजेनिंबाळकर, नवी दिल्ली नगरपालिका परिषदेचे अध्यक्ष नरेश कुमार आणि महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यावेळी उपस्थित होते. विविध प्रकारच्या 110 वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली.

वृक्षारोपण केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना जावडेकर म्हणाले, मानवी जीवनात वृक्षांचे स्थान अमूल्य आहे. वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात व हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. वातावरण बदलामुळे मानवी समाजासमोर निर्माण झालेल्या संकटाला दूर सारण्यासाठी वृक्ष लागवडीची नितांत गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी आयुष्यात किमान पाच झाडे लावावीत व जगवावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच प्रत्येकाने आपल्या परस बागेत, घराजवळ लागवड केलेली झाडे, रोपे यांचे उत्तम संगोपन करावे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन व नवी दिल्ली नगरपालिका परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)