दहाच्या नाण्याला अजूनही नकारघंटा; सोशल मीडियावरील अफवांमुळे त्रास

नाणे स्वीकारण्यास व्यापारी, नागरिक तयार नाहीत

पिंपरी  – सुमारे दोन वर्षांपूर्वी दहा रुपयांचे नाणे बंद झाले असल्याची अफवा उडाली होती. कित्येकदा याबाबत स्पष्टीकरण होऊनही अजूनही दहा रुपयांच्या नाण्याला अजूनही नकार मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात दहा रुपयांचे नाणे चलनातून बंद झाल्याच्या अफवा संपता-संपता संपत नाही. यामुळे छोटे-मोठे दुकानदार, रिक्षा चालक व भाजी मंडईतील विक्रेते दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देत आहेत. दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याचे कारण देत स्वीकारण्यास नकार देत आहेत. त्यामुळे नागरिकही स्वतः जवळील दहा रुपयांचे नाणे इतरांना खपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच, व्यापारी देखील आपल्याकडे असणारी नाणी शक्‍य त्या प्रकारे ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करतात, परंतु ग्राहक देखील घेण्यास नकार करत असल्याचे चित्र आहे.

नकली करन्सी आणि सरकारकडून दहा रुपयांचे नाणे बंद करण्यात आल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दैनंदिन व्यवहारात अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, मेडीकल, खाद्य पदार्थाचे स्टॉल, दूध विक्रेते 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांसह दुकानदारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

जेव्हा ही नाणी चलनात नवीन आली होती, तेव्हा ही नाणी मिळवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. कित्येकांनी नाणे आले की ते संग्रही ठेवण्यास सुरुवात केली होती. काही नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी दहा रुपयांची वेगवेगळी नाणी ही बचतीचे पर्याय बनले होते. दहाचे नाणे आले की ते न खर्चता गल्ल्यात टाकायचे ही सवयच लागली होती. आता ही नाणी स्विकारली जात नसल्याने ज्यांच्याकडे नाणी आहेत, ते या ना त्या प्रकारे बाहेर काढत आहेत.

बॅंकांच्या बाहेर फलक

ज्या नागरिक व व्यापाऱ्यांकडे दहाची नाणी अधिक आहेत, ते यासाठी बॅंकेकडे धाव घेतात. काही महिन्यांपूर्वी अचानकच बॅंकाकडे दहाच्या नाण्यांची आणि पाच रुपयांच्या नोटांची आवक वाढली होती. नाणी बंद झाल्याची अफवा लक्षात घेत भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दहा रुपयांची नाणी व पाच रुपयांची नोट बंद केली नसल्याचे जाहीर केले. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पाच रुपयांची नोट व दहा रुपयांचे नाणे बंद झाले नाही, असा सूचना फलक प्रत्येक बॅंकांसमोर लावले आहेत. मात्र, तरीही दहा रुपयांच्या नाण्याला अजूनही नकार मिळत आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून सर्व बॅंकांच्या बाहेर व बॅंकेत फलक लावण्यात आले आहेत. दहा रुपयांचे नाणे व पाच रुपयांची नोट चलनातून बाद केलेली नाही. ती न स्विकारणे हे कायद्याचे कलम 124 (अ) भादंवि नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. यामुळे 10 रुपयाचे नाणे व 5 रुपयाची नोट व्यवहारात घ्यावी, असे फलक लावण्यात आले आहेत.

“ग्राहक खरेदी करताना आम्हाला दहाचे नाणे देतात, परंतु आमच्याकडून घेत नाहीत. यामुळे नाण्याची संख्या वाढत चालली असून नाणे गल्ल्यांत पडून राहत आहे. याबाबत जनजाग़ृती होणे आवश्‍यक आहे.
-करण बुधल, किराणा दुकान व्यापारी, पिंपरी

काय म्हणतो आरबीआयचा ग्राहक सेवा नंबर

आरबीआयकडून नागरिकांसाठी सुरू केलेल्या 14440 या क्रमांकावर कॉल केल्यास शंकेचे निरसन केले जात आहे. 10 रुपयांच्या नाण्यावर शंका उपस्थित करु नका, हे नाणे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विषयावरुन डिझाईन केले जाते. त्यांना चलनात एका विशेष वेळी आणले जाते. यावर व्यक्तीविशेष, योजना याबाबत छायाचित्र असतात. तर, हे नाणे विविध प्रकारे डिझाईन केले गेले आहे, जास्त काळापर्यंत नाणे टिकत असल्याने नाण्याचे निर्माण केले गेले आहे. याचा वापर करतांना कुठलाही संकोच करु नये, असे सांगण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)