निराशाजनक पराभवातून खूप काही शिकायला मिळाले – रोहित शर्मा

तिसऱ्या सामन्यानंतर रोहित शर्माने व्यक्‍त केली भावना

हॅमिल्टन  -भारतीय संघाने तिसरा टी-20 सामना केवळ 4 धावांनी गमावल्याने भारताला मालिकाही 2-1 अशा फरकाने गमावावी लागली. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये पहिली टी-20 मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले. मात्र, पराभवातून भरपूर शिकायला मिळाले अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्‍त केली आहे.

सामन्यानंतर बोलताना रोहित म्हणाला की, आम्ही लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. मात्र, आम्ही आमचे लक्ष्य पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे आम्ही खूप निराश झालो आहोत. मात्र, आम्ही शेवटपर्यंत लढा दिला याचा आम्हाला आनंद आहे. पराभव हा निराशाजनक असतो आणि अशा महत्त्वाच्या सामन्यात पराभव होणे हे जास्तच निराशा आणणारे असते.

मात्र, आम्हाला या पराभवातूनही बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. आम्ही एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करत ती मालिका आम्ही 4-1 अशा फरकाने एकतर्फी जिंकली होती. आम्हाला तशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा टी-20 मालिकेतही होती. मात्र, आमच्या अपेक्षेपेक्षा उलट या मालिकेत घडले. आमच्या संपूर्ण संघाने मालिका विजयासाठी भरपूर मेहनत घेतली होती. मात्र, या पराभवाने त्यांच्या पदरी निराशा आली आहे असेही तो यावेळी म्हणाला.

कारण आजच्या सामन्यात आमच्या सलामीच्या फळीने निराशा केल्यास मधल्या फळीतील फलंदाज मोठ्या लक्ष्याकडे सहजपणे वाटचाल करू शकतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. आमच्या समोर 212 धावांचे मोठे लक्ष्य होते. यावेळी शिखर धवन लवकर बाद झाल्यानंतर आलेल्या विजय शंकरने त्याच्यातील प्रतिभा दाखवत तो संघासाठी किती महत्त्वपूर्ण खेळाडू आहे हे दाखवून दिले आहे. त्याचबरोबर त्याने केलेल्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाला आवश्‍यक धावगती राखून ठेवता आली आणि आम्ही लक्ष्याचा अधिक जवळ पोहोचू शकलो.

तर, ऋषभने देखील तो कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटू शकतो हे आपल्या छोटेखानी खेळीतून दाखवून दिले होते. मात्र, अजूनही त्याला परिस्थितीनुसार फलंदाजी करायला शिकायला हवे. जेणेकरून तो अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहील आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलू शकेल. तर, दुसरीकडे रोहितने भारतीय गोलंदाजांची पाठराखण करताना सांगितले की, एखादा दिवस गोलंदाजांसाठी खराब असतो. त्याप्रमाणे अखेरच्या सामन्यात त्यांचा दिवस खराब होता. मात्र, आमच्या क्षेत्ररक्षकांनी काही सोपे झेल सोडल्याने आम्हाला न्यूझीलंडला कमी धावांमध्ये रोखण्यात अपयश आले असेही तो यावेळी म्हणाला.

त्याचबरोबर सामन्यानंतर बोलताना न्यूझीलंडचा सलामीवीर आणि विजयाचा शिल्पकार कॉलिन मुन्‍रो म्हणाला की, सामन्यात मी विशेष काही करण्याचा प्रयत्न केला नाही. मी केवळ आल्यापासून भारतीय गोलंदाजांवर दडपण आणण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि त्यात मला यश मिळाले ज्यात मला काही वेळा माझ्या भाग्याला लाभ झाला. त्यामुळे माझी खेळी अधिक सोपी झाली.

त्याचप्रमाणे अखेरच्या षटकापर्यंत सामना दोन्ही संघांचा होता. कोणताही संघ हा सामना जिंकू शकेल अशी परिस्थिती यावेळी निर्माण झाली होती. कारण भारतीय संघात एकापेक्षा एक प्रतिभावान फलंदाज आहेत. तुम्ही एकाला बाद केले तर त्याच्यापेक्षा आणखीन चांगला फलंदाज पुढच्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. मात्र, आम्ही शेवटपर्यंत ठरवल्यानुसार गोलंदाजी केली आणि विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो असेही त्याने यावेळी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)