चिंचवड येथील प्रकार : पतीसह सासू-सासरे व दिरावर गुन्हा
पिंपरी – सुनेच्या अंगात भूत आहे, या अधंश्रद्धेपोटी सुशिक्षित कुटुंबाकडून सुनेला मारहाण व गुंगीचे औषध पाजल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सुनेच्या अंगातील भूत काढण्यासाठी सुशिक्षित सासरच्या मंडळींनी 30 वर्षीय सुनेला मारहाण करुन गुंगीचे (नशा येणारे) औषध पाजले आणि धक्कादायक म्हणजे हे औषध पाजल्यानंतर महिलेचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला. अशी फिर्याद पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याप्रकरणी पीडित सुनेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पती परवेश शहा, सासरे बाबुमिया शहा, सासू शाबाज शहा, जाऊ सना शहा व नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला चिंचवडमधील गांधी पेठ येथे पती, सासू, सासरे, दिर, जाऊसोबत राहते. तर नणंद मुंबईमधून चिंचवड येथे आली होती. या सर्वांनी मिळवून पीडिता विवाहितेच्या अंगात भूत आहे, असे समजून अंधश्रद्धेपोटी तिच्या अंगातील भूत पळवून लावण्यासाठी सुनेला मारहाण करत जबरदस्ती नशा येणारे औषध पाजले. हे औषध पाजल्यानंतर त्याचा व्हिडिओ देखील तयार केला. तसेच पीडित महिलेच्या माहेरच्या लोकांकडून तिच्या सासरच्यांनी वारंवार पैसे घेतले. तसेच तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.