‘त्या’ वक्‍तव्यामागे ‘शिरुर फॉर्म्युला’?

आढळराव-पवार सामना : महेश लांडगेंची राजकीय हवा काढण्याचा प्रयत्न


-निशा पिसे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी – ‘साहेबांनी सांगितल्यास शिरुरमधून निवडणूक लढवू’, अशी गर्जना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करताच “मलाही लिंबू-टिंबू विरोधात लढण्यापेक्षा अजित पवारांशी दोन होत करण्याचा आनंद होईल’, असे प्रत्युत्तर शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार महेश लांडगे यांची राजकीय हवा कमी करण्याची खेळी असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपचा वारू रोखण्यासाठी लोकसभेला शिवसेना तर विधानसभेला राष्ट्रवादी हा 2009 चा “शिरुर फॉर्म्युला’ पुन्हा एकदा अंमलात आणण्याचा हा प्रयत्न असल्याचाही तर्क लढविला जात आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे सर्वत्र वारे वाहू लागले आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघात शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टक्‍कर देवू शकेल, असा सक्षम चेहरा नाही. खासदार आढळराव पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झाल्यापासून पूर्वीचा खेड आणि आताचा शिरुर लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. गेली 15 वर्षे आढळराव यांनी हा बालेकिल्ला टिकवून ठेवला आहे.

मात्र, भाजप लाटेमुळे मागील विधानसभा निवडणुकीनंतर शिरुर लोकसभा मतदार संघातील राजकीय गणिते बदलली. शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये भोसरी, खेड-आळंदी, शिरुर, जुन्नर, हडपसर, आंबेगाव या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. यापैकी केवळ खेड विधानसभेत सुरेश गोरे हे शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. हडपसरमध्ये योगेश टिळेकर, शिरुरमध्ये बाबुराव पाचर्णे आणि भोसरीत सहयोगी महेश लांडगे असे सहापैकी तीन विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार आहेत.

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभा निहाय निरीक्षण केले असता भाजपचे पारडे जड आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपचे प्राबल्य वाढले आहे. त्यामुळे खासदार आढळरावांसाठी लोकसभेची लढाई सोपी नाही. तर विधानसभेलाही राष्ट्रवादीसाठी बिकट वाट आहे. सध्या आढळराव पाटील यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्याकडे पाहिले जात आहे.

जुन्नरचे कुसुर गाव दत्तक घेवून शिरुर लोकसभेचे मनसुबे आमदार लांडगे यांनी यापूर्वीच उघड केले आहेत. त्यांच्या वाढदिवसाचा नुकताच झालेला इव्हेंट राजकीय वातावरण निर्मिती करणारा ठरला. आमदार लांडगे आढळरावांविरोधात शड्डू ठोकणार असल्याची चर्चा रंगली असतानाच अजित पवार यांनी आपण शिरुरमधून लढण्यास इच्छूक असल्याचे सांगत बॉम्ब टाकला. त्यामुळे मतदार संघातील चर्चेचा सूर पालटला असून त्यामागे राजकीय खेळी असल्याची जोरदार चर्चा आहे.

आढळरावांचा रोख नेमका कोणावर?

शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या नावाची कोणतीही चर्चा नव्हती. मात्र, अजित पवार यांनीच शिरुरमधील एका कार्यक्रमात, “”शरद पवार साहेबांनी सांगितले तर शिरुरमधून लढू आणि निवडून आलो नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही”, असे वक्तव्य केले.

त्यावर दुसऱ्याच दिवशी खासदार आढळराव पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. “”मलाही लिंबू-टिंबूंच्या विरोधात लढण्यापेक्षा अजित पवार यांच्याशी दोन होत करण्याचा आनंद होईल”, असे सांगितले. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे शिरुरमधील राजकीय सूर पालटला असताना त्यात आमदार लांडगे यांचे नाव पिछाडीवर पडले आहे. “लिंबू-टिंबू’ संबोधत आढळरावांना रोख कोणावर होता, याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

काय आहे “फॉर्म्युला 2009′?

2009 च्या लोकसभा निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या हात मिळवणीतून लोकसभेला आढळराव तर विधानसभेला राष्ट्रवादी असा “शिरुर फॉर्म्युला’ उदयास आला. त्यावेळी खुद्द शरद पवार शिरुर लोकसभा लढविणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, ऐनवेळी शरद पवार माढा मतदार संघातून लढले. तत्कालीन आमदार विलास लांडे यांना आयत्यावेळी उमेदवारी देण्यात आली. त्यांचा “बळीचा बकरा’ केल्याची चर्चाही रंगली होती. खुद्द अजित पवार यांनीही राष्ट्रवादीचे आमदार असताना खासदार शिवसेनेचा कसा, अशी सल वारंवार बोलून दाखवली होती.

हे बोलतानाच त्यांनी स्थानिक नेत्यांच्या छुप्या युतीचा “शिरुर फॉर्म्युला’ही जाणीवपूर्वक चर्चेत आणला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट पाहता आता खुद्द अजित पवार हा “फॉर्म्युला’ खासदार आढळरावांच्या मदतीने अजमावू पाहत असल्याची चर्चा शिरुर लोकसभा मतदार संघात रंगली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)