विरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार; अशोक पवार यांना विश्‍वास

वडगाव रासाई (ता. शिरूर) : येथे मतदारांना मार्गदर्शन करताना माजी आमदार ऍड. अशोक पवार.

डॉ. कोल्हेंच्या प्रचारार्थ वडगाव रासाईत सभा

वडगाव रासाई – विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने संस्कारक्षम आणि चारित्र्यवान उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर बेताल वक्‍तव्य करणाऱ्यांना आपण मतदारांना किती थापा मारतो याचे भान मात्र राहिले नाही. डॉ. कोल्हे यांच्यासारखा सुशिक्षित उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने निवडून येणार आहे, आणि विरोधी उमेदवारांचा त्रिफळा उडणार आहे, असा विश्‍वास शिरूर-हवेलीचे माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी व्यक्‍त केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी व महाआघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ वडगाव रासाई येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. यावेळी डॉ. अमोल कोल्हे, सुजाता पवार, दिलीप मोकाशी, उत्तमराव सोनवणे, रामजी शेलार, देविदास परभाने, सुरेश चव्हाण, कुंडलीक शितोळे, उद्धव शेलार, माजी सरपंच पोपट शेलार, अंकुश सोनवणे, निर्मला ढवळे, सरपंच बाबासाहेब फराटे, सरपंच शिवाजी शेलार, उपसरपंच नामदेव कोळेकर, सचिन पवार, कल्पना शेलार, धोंडिभाऊ ढवळे, पांडुरंग शेलार, शहाजी ढवळे, अप्पासाहेब शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

अशोक पवार म्हणाले की, एमआयडीसीमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्‍के विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील व आम्ही हटविले. मात्र, सत्तेवर येताच या सरकारने दुसरीकडे एमआयडीसी आणली, पण शेतकऱ्यांना 70 हजार एकरचा भाव देऊन यांनी तीच जमीन 40 लाख रुपयाने सरकाराला विकली. मग असे सातबारा गोळा करणाऱ्यांना जनतेच्या हिताच्या गप्पा मारण्याचा आणि दुसऱ्या स्वच्छ व्यक्तिमत्वावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे अशा लोकांची टीका अर्थहीन असल्याने त्याकडे लक्ष देण्याचीही गरज नाही. आपला उमेदवार हा सक्षम आहे. आता परिर्वतन नागरिकांनाच हवे आहे. त्यामुळेच आज संपूर्ण लोकसभा मतदारसंघात मताधिक्‍य देण्यासाठी गावा-गावांमध्ये स्पर्धा लागली आहे. 4 लाखांच्या लीडने डॉ. कोल्हे निश्‍चित विजयी होणार, असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

शेतकरी, व्यापारी रसातळाला

गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी, व्यापारी रसातळाला गेला. आर्थिक मंदी आली. अनेक तरुण बेरोजगार झाले. त्यामुळे यंदा शिवसेना-भाजप सरकार सत्तेवर येणार नसल्याचे अशोक पवार यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)