गांधी कुटुंबीयाशिवाय इतर अध्यक्ष झाल्यास पक्ष फुटेल – नटवर सिंह

प्रियांका गांधी यांच्यात पुरेसे नेतृत्वगुण

नवी दिल्ली – गांधी कुटुंबीयाशिवाय इतर कोणी कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाल्यास कॉंग्रेस पक्ष 24 तासांत फुटेल, असा दावा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते नटवर सिंह यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडले आहे. ते पुन्हा अध्यक्ष होण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रियांका गांधी यांना अध्यक्ष करण्याचा आग्रह त्यांनी केला. मात्र, राहुल यांनी गांधी कुटुंबातून कोणीही अध्यक्ष होणार नसल्याचे सांगितले आहे, याकडे लक्ष वेधले असता सिंह म्हणाले की, जर इतर कोणी अध्यक्ष झाला तर पक्ष फुटू शकतो. त्यामुळे राहुल आणि गांधी कुटुंबातील इतरांनी या विषयावर निर्णय घ्यायचा आहे.

गेल्या आठवड्यात प्रियांका यांनी सोनभद्रा या उत्तर प्रदेशातील भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी गोळीबारात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्यानंतर त्यांनी रात्रभर तेथेच मुक्काम ठोकला. यावरून प्रियांका यांचे नेतृत्वगुण आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी दिसून येते. त्यामुळे प्रियांका यांना अध्यक्ष करण्याची गरज असल्याचे सिंह यांनी सांगितले.

134 वर्षांची परंपरा असलेल्या कॉंग्रेसला सध्या अध्यक्ष नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. मात्र, गांधी कुटुंबीयाशिवाय इतर कोणी अध्यक्ष होऊ नये असे सांगितले. 50 दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकांतील पराभवाची जबाबदारी घेऊन कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण पराभावाचे उत्तरदायित्व स्वीकारून राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेतृत्वाच्या अभावामुळे कर्नाटक आणि गोव्यामधील कॉंग्रेस पक्षात पेचप्रसंग निर्माण झालेले आहेत. असे पेचप्रसंग इतर राज्यात होऊ नये.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)