सहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी उपयोगी – राधामोहन सिंह

-टीका करणाऱ्या शहरांतील लोकांना या रकमेचे मूल्य समजणार नाही
-आज बऱ्याच अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार पहिला हप्ता

नवी दिल्ली – केंद्र सरकारने पाच एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये थेट मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत फारच कमी असल्याची टीका शहरातील काही लोक करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी ही रक्कम फारच उपयोगी असल्याचे केंद्रीय शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितले आहे.
त्यांनी सांगितले की, शहरातील काही लोक सहा हजार रुपयांचा खर्च एका जेवणासाठी करत असतील. मात्र, शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या विविध कामासाठी आणि शेतीसाठी फारच उपयोगी आहे. या योजनेचा लाभ बारा कोटी लोकांना होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असे या योजनेचे नाव असून या योजनेतील शेतकऱ्यांना रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यातील काही भाग दिला जाण्याची शक्‍यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात 75 हजार कोटी रुपये खर्चाची ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 12 कोटी छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 52 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. सध्याच्या रालोआ सरकारने एका योजनेत शेतकऱ्यांना 75 हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अनेक आघाड्यांवर प्रयत्न केले जाणार आहेत.

शेतकऱ्यांच्या उत्पादनांच्या किमान आधारभूत किमती वाढविल्या आहेत. त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा उभी करण्यात येत आहे. त्याचबरोबर अन्नप्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शिवाय शेतकऱ्यांना जोडधंदे करता यावेत याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व बाबींमुळे पुढील तीन वर्षात भारतातील शेतकरी सुखी समाधानी होईल असा दावा त्यांनी केल.

“गेल्या अनेक दशकांत शेतकऱ्यांना कर्ज, अनुदानाच्या माध्यमातून मदत केली गेली आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याच्या दर्जात कसलाही फरक पडलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आता अनुदानाऐवजी थेट रक्कम देणे सुरू केले आहे. याशिवाय दीडपट हमीभाव, अन्नप्रक्रिया उद्योग आणि जोड उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सरकारकडून चालू आहे.
-राधामोहन सिंह, शेतकरी कल्याण मंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)