पीएमपीच्या ‘तेजस्विनी’ बसमध्येही पुरुषांची घुसखोरी

मुख्य उद्देशालाच हरताळ : तोटा होत असल्याचे पीएमपीकडून कारण

पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांची सर्वांत प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) महिलांना सुरक्षित व चांगली प्रवास सेवा देण्याकरीता तेजस्विनी या विशेष बसची सुरूवात करण्यात आली. केवळ महिला प्रवाशांसाठी सुरु करण्यात आलेल्या या बसेसमध्ये आता पुरुषांची घुसखोरी वाढत आहे. सर्वांत आश्‍चर्याची बाब अशी की पुरुष प्रवासी या बसमध्ये बेकायदेशीर रित्या प्रवेश करत नसून तोट्याचे कारण दाखवत “पीएमपी’च पुरुष प्रवाशांना प्रवेश देत आहे.

याबाबत महिला प्रवाशांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे पीएमपीकडून केल्या जाणाऱ्या नव-नवीन प्रयोगांना योग्य अमंलबजावणी अभावी वारंवार अपयशाचा सामना करावा लागत आहे. यामुळे महिलांची पसंतीची असलेली व चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्य “तेजस्विनी’ या विशेष उपक्रमाला देखील फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

खास महिलांसाठी “तेजस्विनी’ या विशेष बसच्या माध्यमातून “पीएमपी’च्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी 37 तेजस्विनी बस धावत आहेत. वर्षभरात सुमारे 28 लाख महिला प्रवाशांनी या माध्यमातून प्रवास केला आहे. तर, वार्षिक उत्पन्न 4 कोटीच्या पुढे आहे. या बसचे दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे साडेतीन हजारच्या जवळपास आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या 9 मार्गात सध्या ही बस धावत असून, येत्या काळात त्याची संख्या वाढवणार असल्याचे “पीएमपी’च्या प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. महिला दिनानिमित्त यावर्षीपासून दर महिन्याच्या 8 तारखेला महिला प्रवाशांना विनामूल्य प्रवासाची सुविधा दिली जात आहे. मात्र, या बसेसमध्ये प्रवासी संख्या कमी असल्याने पीएमपीला तोटा होत असल्याचे कारण पुढे करत पुरुष प्रवाशांना प्रवेश दिला जात असल्याने तेजस्वीनी बसेसच्या मुख्य उद्देशालाच बगल दिली जात आहे.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरीता पीएमपीकडून विविध योजना आखण्यात येतात व सवलती देण्यात येतात. याचाच भाग म्हणून विविध पासेस सेवा व महिलांसाठी खास गेल्या वर्षीपासून स्वतंत्र बससेवा म्हणून तेजस्विनी बसची सुरुवात करण्यात आली आहे. तर, महिन्यातून एकदा 8 तारखेला या बसेसमधून विनामूल्य प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे महिला प्रवासी संख्या वाढत असताना पीएमपी प्रशासनाची उदासीनता परत एकदा दिसून येत आहे.

-एकूण 37 तेजस्विनी बस
– शहरात तेजस्विनी 9 मार्गांवर धावतात
-दैनंदिन प्रवासी संख्या 3500
-वर्षभरात उत्पन्न 4 कोटींहून अधिक
-वर्षभरात 28 लाख प्रवाशांनी केला प्रवास

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव, अप्पा बळवंत चौक ते सांगवी, मनपा ते आळंदी, मनपा ते आकुर्डी रेल्वे स्थानक, निगडी ते हिंजवडी-माण फेज-3 या काही शहरातील मार्गावर बस धावत आहेत. मात्र, या बसेसमध्ये बऱ्याच त्रुटी असून याबाबत महिलांच्या तक्रारीची संख्या सातत्याने वाढत आहे.

त्यात, अनेकदा पुरुषांना बसेसमध्ये घेतले जात असल्याने बसेसचे महत्व कमी होत आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या तेजस्विनी बसेसची मागणी वाढत असून 25 ते 30 बसेस अजून पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मात्र, पीएमपीच्या ढिसाळ नियोजनाचा फटका तेजेस्विनी बसेसला सुद्धा बसण्याची शक्‍यता प्रवाशांकडून वर्तवली जात आहे.

“तेजस्विनी बसेसची सुरुवात ही महिलांना सुरक्षित प्रवास मिळावा, याकरीता केली असून यात नफा-तोट्याचा प्रश्‍नच येता कामा नये. तेजस्विनी बसेसच्या माध्यमातून कित्येक महिलांनी आपले खासगी वाहन सोडून बसने प्रवास करण्यास सुरुवात केली होती. असे असताना पुरुषांना बसेसमध्ये प्रवेश देणे चुकीचे आहे. यामुळे तेजस्विनी बसेसचे महत्व कमी होत असून हे काम पीएमपीचे अधिकारीच करीत आहेत.
-संजय शितोळे, सचिव पीएमपी प्रवासी संघ पुणे.

“तेजस्वेनी बसेस ह्या राज्य शासनाने पुरविल्या आहेत. शासनाच्या जी.आर नुसार सकाळी 7 ते 12 व संध्याकाळी 4 ते 8 वाजे पर्यंत फक्‍त महिलांना प्राधांन्य दिले जाते. मात्र, इतर वेळी पुरुषांना प्रवेश दिला जातो. हा नियम पीएमपीचा नसून राज्य शासनाचा आहे.
– सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी पुणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)