लक्ष्मण जगताप की राहुल कलाटे; कोण ठरणार बाजीगर !

चिंचवडमध्ये हालचालींना वेग : युतीच्या समीकरणामुळे अनेकांमध्ये अस्वस्थता


– तुषार रंधवे

पिंपरी – आगामी लोकसभा व विधानसभेसाठी सेना-भाजपची युती झाली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेवर विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा दावा भक्कम झाला मात्र, शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा पत्ता कट झाल्याचे समजले जात आहे. दरम्यान, कलाटे यांनी आता राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू केली असून, कोणत्याही परिस्थितीत जगताप यांच्या विरोधात मैदानात उतरण्याचा निश्‍चय केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये जगताप की कलाटे…कोण ठरणार बाजीगर? अशी चर्चा रंगली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती होणार की नाही? यावरून अनेक महिने संभ्रमीत वातावरण होते. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाल्याने राज्यातील सर्वच लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराचा विचार करता, चिंचवडमध्ये भाजप, भोसरीत अपक्ष आणि पिंपरीत शिवसेनेचा दावा आहे. यापैकी चिंचवडसाठी भाजपकडून जगतापांशिवाय अन्य इच्छुकांचे नावदेखील ऐकायला मिळत नाही. भोसरीचे आमदार महेश लांडगे भाजपच्या संपर्कात आहेत, तर शिवसेनेचा पिंपरीवर दावा कायम असणार आहे. मात्र, मित्रपक्षांसाठी मतदारसंघ सोडावयाचा झाल्यास खासदार रामदास आठवले पिंपरी विधानसभेच्या मागणीवर नेमकी कोणती भूमिका घेणार? याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चुरस पहायला मिळणार आहे ती चिंचवड विधानसभा मतदार संघात. कारण, भाजपचे शहाराध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवडमधील सध्यस्थितीला “हेवीवेट लीडर’ असलेल्या लक्ष्मण जगताप यांना पक्षांतर्गत विरोधक, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह शिवसेना, मनसेतील विरोधकांचा समना करावा लागणार आहे. जगताप यांच्या विरोधी गटाची मोट बांधून राष्ट्रवादीतही आपली “फिल्डिंग’ लावलेले राहुल कलाटे म्हणजे जगताप यांचा कट्टर प्रतिस्पर्धी मानले जात आहेत.

महापालिका निवडणुकीनंतर शहराध्यक्षपदाची निवड, महापालिकेतील समित्यांवरील निवडी, चिंचवडच्या काही भागातील बांधकामांना पाणी न देण्याचा निर्णय असो…अथवा महापालिकेतील अधिकाऱ्यांवरील दमदाटीचा विषय… प्रत्येक विषयावर आमदार जगताप यांनी कलाटेंना दबावात ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपच्या सूत्रानुसार मावळ लोकसभा शिवसेनेकडे राहणार, ही बाब जगताप यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे युतीधर्माचे पालन करीत निवडणुकीत आपले राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या खासदार बारणे यांचे काम करण्याची मानसिकता जगताप यांची कदापि होणार नाही. त्यामुळे युतीची शक्‍यता लक्षात आल्यापासूनच म्हणजे सुमारे दोन महिन्यांपासून “सक्षम उमेदवार द्या…अन्यथा पराभवाला जबाबदार धरू नका…’ अशी भूमिका जाहीरपणे जगताप घेताना दिसतात.

अशीच काहीशी परिस्थिती चिंचवड विधानसभा निवडणुकीत होणार आहे. जगताप यांचे तिकीट “फिक्‍स’ मानले जाते. त्यामुळे जगताप यांचे कट्टर स्पर्धक असलेल्या शिवसेनेच्या राहुल कलाटे यांना एकतर राष्ट्रवादीकडून उमेदवारी किंवा शिवसेनेतून बंडखोरी करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे जगताप आणि कलाटे यांच्यात कोण बाजी मारणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राष्ट्रवादीतील इच्छुकांची घालमेल…

दरम्यान, चिंचवडमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मोरेश्‍वर भोंडवे यांच्यासह नव्या फळीतील मयूर कलाटे, संदीप पवार यांच्या गटाची घालमेल वाढली आहे. कारण, राष्ट्रवादीतील “चौकट’ म्हणून ओळखले जाणारे दोन पदाधिकारी आणि दोन नगरसेवक राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आपली उमेदवारी ऐनवेळी कट होणार काय? या अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादीतील इच्छुक चिंतेत आहेत.

वास्तविक, गतविधानसभा निवडणुकीत नाना काटे यांनी जगतापांशी लढत दिली होती. पण, त्यांना अपयश आले. यावेळी पुन्हा नाना काटे इच्छुक आहेत. परंतु, पक्षश्रेष्ठींकडून “तयारीला लागा’ असा आदेश न आल्यामुळे अडचण झाली आहे. मध्यंतरी रोजगार मेळावा घेवून त्यांनी विधानसभेची तयारी सुरूही केली आहे. दुसरीकडे, मयूर कलाटे यांनीही “बीग बजेट’ कार्यक्रमांची आखणी करुन नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, सध्या शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले संदीप पवार यांच्याही नावाची चर्चा विधानसभा निवडणुकीसाठी केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आयात उमेदवार देणार की पक्षातील ज्येष्ठाला जबाबदारी किंवा नव्या चेहऱ्याला संधी, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

जगतापांचा गृहकलह सुटेना…

आमदार लक्ष्मण जगताप यांना युतीच्या घोषणेमुळे दिलासा मिळाला असला, तरी गृहकलहाचा फटका सहन करावा लागणार आहे.ऐकेकाळी जगताप यांचे कट्टर असलेल्या नगरसेवक नवनाथ जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी जगतापांविरोधात आघाडी घेतली आहे. त्याला भाजपच्या काही नगरसेवकांनी ताकद दिली आहे. तसेच, राष्ट्रवादीतील दोन प्रमुख पदाधिकारीही जगताप यांच्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत.

दरम्यान, राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादीशी जवळीक वाढवली. पार्थ पवार यांच्या शहरातील दौऱ्यांमध्ये सुरुवातील कलाटे यांनी सहभाग घेतला. तसेच, त्यांची विविध विषयांवर चर्चाही केली. लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये बारणेंविरोधात शड्डू ठोकणारे जगताप यांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरावे लागल्यास गृहकलह प्रथम थोपवावा लागेल. त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसमधील काही समर्थक सवंगड्यांसह भाजपमधील पक्षांतर्गत विरोधकांचाही बंदोबस्त करावा लागणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)