लांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात?

राष्ट्रवादीखेरीज इतर ठिकाणी चाचपणी : युती, आघाडीच्या घडामोडींकडे लक्ष

पिंपरी – विधानसभा निवडणुकीला अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने सर्वच पक्षांत आणि इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली असली तरी राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे आणि अण्णा बनसोडे यांच्या गोटात अद्यापही शांतता आहे. युती-आघाडीच्या घडामोडीनंतरच हे दोघे निर्णय घेण्याची शक्‍यता असून राष्ट्रवादीशिवाय इतर ठिकाणी उमेदवारीची संधी मिळते का? यावरच या दोघांचा अधिक भर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हा सन 2014 पर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र, गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला. तर त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही या पक्षाला सत्तेतून पायऊतार व्हावे लागले. दिवसेंदिवस राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी होऊ लागल्याने अनेक वर्षे सत्तेत असलेल्या आणि आमदारकी भूषविलेल्या विलास लांडे आणि अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली नाही.

गतवेळच्या निवडणुकीत विलास लांडे यांच्या मवाळ आणि त्रुटीरहित प्रचार यंत्रणेमुळे तसेच नागरिकांपासून त्यांचे समर्थक दुरावल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर बनसोडे यांना अतिआत्मविश्‍वास नडला. दोघांनी योग्य पद्धतीने यंत्रणा सांभाळली असती तर चित्र नक्कीच वेगळे असते अशी आजही दोन्ही मतदारसंघात चर्चा आहे. गेल्या पाच वर्षांत पराभव झाल्यामुळे या दोघांनीही जनतेमध्ये राहण्यापेक्षा त्यापासून लांब राहणेच पसंद केल्यामुळे यावेळी राष्ट्रवादी संधी देणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तरुणांना संधी देण्याचे सुतोवाच केल्यामुळे ‘भाकरी फिरविली जाणार’ अशी चर्चा शहरात रंगली होती.

विलास लांडे अपक्ष लढणार?

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून विलास लांडे यांनी अपक्ष म्हणून विजय मिळविला होता. तर आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अपक्ष नगरसेवक म्हणूनच त्यांनी केली होती. यावेळी होणारी विधानसभा त्यांनी अपक्ष म्हणून लढवावी, असा रेटा त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावला आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेस या दोन्ही पक्षाबद्दल मतदारसंघात नाराजी असली तरी आपल्याबाबत व्यक्तीगत लोकांची भूमिका सकारात्मक असल्याचा दावा लांडे गटाकडून केला जात असल्याने ते अपक्ष रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे.

त्यातच या दोघांनी आता उमेदवारी न मागितल्यामुळे पिंपरीतून शेखर ओव्हाळ तर भोसरीतून दत्ता साने यांनी जोर धरला आहे. दोघांनीही विधानसभेची तयारी चालविल्यामुळे राष्ट्रवादी नवा चेहरा देणार का याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. तर राज्य पातळीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार हे निश्‍चित असले तरी या आघाडीत “वंचित’ सहभागी होणार का तसेच शिवसेना आणि भाजपा युती करून लढणार की स्वतंत्र हे मुद्दे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. गतवेळीप्रमाणे आयत्यावेळी काही समिकरणे बदलली जातील आणि आयती संधी मिळेल, या आशेवर लांडे आणि बनसोडे असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत अण्णा बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपण राष्ट्रवादीकडून विधानसभा लढविण्यास इच्छुक असून पक्ष मला संधी देईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)