भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा : पी.व्ही. सिंधूवर भारताची मदार

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली  – माजी विजेती पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत हे सध्या आपल्या लयीत नसले तरी मंगळवारपासून होणाऱ्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्यांच्यासमोर विजेतेपद कायम राखण्याचे आव्हान असून भारतीय संघाची मदार देखील या दोघांवरच अवलंबून आहे. त्यातच फुलराणी सायना नेहवालने दुखापतीमुळे आधीच या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला अव्वल मानांकन मिळाले आहे. चीनमधील अव्वल मानांकित आणि ऑल इंग्लंड विजेत्या चेन युफेई हिने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूलाच विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजले जात आहे. जपानच्या अव्वल बॅडमिंटनपटूंच्या अनुपस्थितीचा फायदाही सिंधूला होणार आहे.

यंदाच्या मोसमात सिंधूने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. मात्र, त्यानंतर प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत सिंधू पहिल्याच फेरीतून बाहेर पडली होती . मात्र, या पराभवांतून बोध घेत सिंधू दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचा पहिला सामना मुग्धा आग्रे हिच्याशी होणार आहे. त्यानंतर सिंधूला अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी दानिश मिया ब्लिचफेल्ड किंवा हे बिंगजियाओ यांच्याशी लढत द्यावी लागण्याची शक्‍यता आहे. महिलांमध्ये वृषाली गुम्माडी आणि साई उत्तेजिता राव या युवा बॅडमिंटनपटूही सहभागी होणार आहेत.

पुरुषांमध्ये अव्वल मानांकित शी युकी याने माघार घेतल्यामुळे श्रीकांतला विजेतेपदाची संधी आहे. 2017 मध्ये चार जेतेपदे पटकावणाऱ्या श्रीकांतला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही. त्याला सलामीच्या लढतीत हॉंगकॉंगच्या वॉंग विंग की विन्सेन्ट याच्याशी झुंज द्यावी लागणार आहे. समीर वर्मा आणि बी. साईप्रणीथ हे श्रीकांतच्याच गटात असल्यामुळे ते एकमेकांशी भिडण्याची शक्‍यता आहे.

वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारणाऱ्या पाचव्या मानांकित समीरची सलामीच्या सामन्यात डेन्मार्कच्या रासमस गेमके याच्याशी गाठ पडणार आहे. एच. एस. प्रणॉय, शुभंकर डे, अजय जयराम आणि पारुपल्ली कश्‍यप हे भारतीय बॅडमिंटनपटूही या स्पर्धेत नशीब अजमावणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)