नमो ऍपवरून 15 लाखांच्या वस्तूंची विक्री

कॉफी मग, टी-शर्ट, किचेन्स आणि मुखवट्यांचा समावेश

नवी दिल्ली -नमो ऍपवरुन मोदींचे फोटो आणि स्लोगन असणाऱ्या अनेक गोष्टी विकल्या जातात. यामध्ये कॉफी मग, टी-शर्ट, किचेन्स, टोप्या यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो ऍपवरून मागील तीन महिन्यांमध्ये 5 कोटींच्या वस्तू विकल्या गेल्या आहेत.

काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमी नमो अगेन म्हणजेच पुन्हा एकदा नमो या मोहिमेंतर्गत वेगवगेळ्या वस्तू या ऍपवरून विकल्या जात आहेत. 90 दिवसांमध्ये या ऍपवरून 15 लाख 75 हजार वस्तू विकल्या गेल्या आहेत. जसजशी निवडणुक जवळ येईल तशी या वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नमो ऍपवरून सर्वाधिक खरेदी ही भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधून आणि देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मागील महिन्यापासून पेटीएम आणि ऍमेझॉनसारख्या माध्यमातूनही नमो ब्रॅण्डच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या डिजिटल इंडियाचा फायदा त्यांच्याच वस्तूविक्रीला अधिक झाल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच देशामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. असे असतानाच राजकीय पक्ष वेगवेगळ्या माध्यमांमधून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता भाजपाने मोदींच्या चेहऱ्याचा मुखवटा विकण्यास सुरुवात केली आहे. नमो ऍप्लिकेशवरून हा मुखवटा विकत घेता येणार आहे.

भाजपाच्या औपचारिक ट्‌विटर हॅण्डलवरून या मुखवट्याच्या विक्रीबद्दलचे ट्‌विट करण्यात आले आहे. हा मुखवटा 275 रुपयांना उपलब्ध असून तीन मुखवट्यांचा सेट 699 रुपयांना विकत घेता येईल.

भाजपाच्या काही खासदारांनी नमो हुडी चॅलेंजच्या नावाने नमो ब्रॅण्डचे हुडी घालून फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीसारख्या नेत्यांनी नमो ब्रॅण्डच्या वस्तू घेण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे नमो ब्रॅण्डच्या वस्तूंचा खप वाढल्याचे बोलले जात आहे. भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी नमो अगेनची टीशर्ट घालून ट्‌विटवर फोटो पोस्ट केले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)