निवडणुकीच्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण करा

आमदार लक्ष्मण जगताप यांची महापौरांकडे मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ताकर पूर्णतः माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा. निवडणुकीच्या वेळी पिंपरी-चिंचवडकरांना दिलेली वचने पूर्ण करा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौर राहुल जाधव यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार जगताप यांनी महापौर जाधव यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपने शहरातील नागरिकांना सुखकर सुविधा देण्याचे वचन दिले होते. नागरिकांनीही निवडणुकीत भाजपला भरभरून साथ दिली आणि महापालिकेत पक्षाची एकहाती सत्ता आहे. सत्तेत आल्याने शहरातील नागरिकांना निवडणुकीच्यावेळी दिलेली सर्व वचने पूर्ण करणे हे पक्षाचे कर्तव्य आहे. त्यानुसार शहरातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ताकर पूर्णतः माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा.

पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांमध्ये सर्वसामान्य कुटुंबे राहतात. अशा कुटुंबांनी रोजच्या जगण्यातून पै-पै जमवून आपल्या घरांचे स्वप्न कसे-बसे पूर्ण केलेले असते. अनेकजण 500 चौरस फुटांच्या घरांसाठी विविध बॅंका आणि फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून आयुष्यभर हे कर्ज फेडत असतात. अशा नागरिकांना करातून दिलासा मिळाल्यास त्यांना आपले कुटुंब जगवणे सुखकर होईल. त्यासाठी 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर पूर्णतः माफ करावा लागणार आहे. त्यानुसार महापालिकेमार्फत हा धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)