कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या रडारवर ‘इंडिगो’

राकेश गंगवाल यांच्या हरकतीची चौकशी होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – कंपनी व्यवहार मंत्रालयाने इंडिगो कंपनीतील प्रकरणांची गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात चौकशी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: पार्टी डिलसंदर्भातील घडामोडीची तपशिलात चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जाते.

इंडिगोचे एक प्रवर्तक राकेश गंगवाल यांनी सेविला पत्र पाठवून कंपनीतील कार्पोरेट गव्हर्नंसबाबत शंका व्यक्त केलेल्या आहेत. या पत्रातील प्रत्येक परिच्छेदाची काळजीपूर्वक छाननी केली जाणार असल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाकडून सूचित करण्यात आले. या पत्रात सेबीला कंपनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करून तक्रारीची दखल घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे.

कंपनी कायद्याप्रमाणे कारभार चालतो आहे का, संचालक मंडळाने घेतलेले ठराव कंपनी कायद्याच्या चौकटीत बसतात का, याची चौकशी केली जाणार आहे. जर कंपनीचे व्यवस्थापन दोषी आढळले तर कंपनी व्यवहार मंत्रालय कंपनी कायदा 2013 मधील कलम 6 नुसार अधिकाराचा वापर करू शकते.

यानुसार कंपनी व्यवहार मंत्रालय अयोग्य निर्णय रद्द करू शकते. गंगवाल यांच्या पत्रातील प्रत्येक परिच्छेदात उपस्थित केलेल्या मुद्याचे स्पष्टीकरण व्यवस्थापनाने सादर करावे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गंगवाल यांनी गेल्या काही दिवसात कंपनीच्या व्यवस्थापनाने केलेल्या पार्टी डीलवर आरोप केलेले आहेत. त्या संदर्भात अधिक स्पष्टीकरण कंपनी व्यवहार मंत्रालयाला हवे आहे. इंडिगो कंपनी इंटरग्लोब अव्हिएशन या समूहाकडून चालविली जाते. या समूहाकडे दोनशे विमाने असून दिवसाला 1400 विमानांची सेवा प्रवाशांना दिली जाते.

राकेश गंगवाल यांनी केलेले आरोप कंपनीचे एक दुसरे प्रवर्तक राहुल भाटिया यांनी फेटाळले आहेत. कंपनी कायद्यातील सर्व तरतुदींनुसारच व्यवस्थापनाने आणि संचालक मंडळाने निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे कंपनी वेगाने वाढत असून भारतातील सर्वात मोठी नागरी विमान सेवा देणारी कंपनी ठरलेले आहे असे भाटिया यांनी म्हटले आहे.

गंगवाल यांनी सेबीला पाठविलेल्या पत्राची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, नागरी विमान वाहतूक मंत्री हार्दिक सिंह पुरी, वाणिज्यमंत्री पियुष गोयल, कंपनी व्यवहार सचिव श्रीनिवास यांना पाठविलेल्या आहेत. त्यांचे इंटरग्लोब ऍव्हिएशन मध्ये 37 टक्के भाग भांडवल आहे तर भाटिया यांचे या कंपनीत 38 टक्के भाग भांडवल आहे. गेल्या आठवड्यात या घडामोडींमुळे या कंपनीच्या शेअरच्या भावावर बराच परिणाम झाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)