भाजपाशी युती जनतेच्या भल्यासाठी होती – मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर – भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय माझा नसून माझे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांचा होता. कश्‍मिरी जनतेच्या भल्यासाठीच त्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी केली होती, असे जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

कश्‍मिरी जनतेचा विश्‍वास गमावल्याने हतबल झालेल्या जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना एका कार्यक्रमादरम्यान अचानक रडू कोसळले व त्या पीडीपीच्या नेत्यांसमोर ढसाढसा रडल्या. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

यात मेहबूबा नेत्यांबरोबरच जनतेलाही भाजपबरोबर युती का केली होती हे पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. आम्ही फक्‍त कश्‍मीर व य़ेथील जनतेच्या भल्यासाठीच भाजपबरोबर युती केली होती.
हे तुम्ही का समजून घेत नाही? काश्‍मिरी जनतेला माझ्या वडिलांचे बलिदान का समजत नाही? भाजपबरोबर जाण्याचा निर्णय माझ्या वडिलांचा होता. त्यामुळे काश्‍मीरमधील परिस्थिती बदलेल असे त्यांना वाटले होते. 2016 साली ज्यावेळी माझ्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा शेवटच्या श्‍वासापर्यंत ते काश्‍मिरी जनतेच्या समस्यांचाच विचार करत होते.

पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजासाठी काहीही केले नाही. त्यांना जाऊन विचारा की पुराच्या वेळी आमच्या राज्यासाठी 8000 कोटी रुपयांची मदत केली होती की नाही? असा सवालही मुफ्ती यांनी यावेळी केला.
23 एप्रिल रोजी पहलगाम येथे लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मुफ्ती यांनी पीडीपीला मत देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमध्ये 2015 साली भाजप-पीडीपी यांची युती झाली होती व ते सत्तेत आले होते. त्यानंतर मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. पण 7 जानेवारी 2016 साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर काही महिन्यांनी मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू- काश्‍मीरच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)