पुत्रासाठी वाट्टेल ते…! घरभेद्यांशी हातमिळवणी; अजित पवारांच्या भूमिकेने निष्ठावंतांमध्ये नाराजी

घरभेद्यांशी हातमिळवणी; अजित पवारांच्या भूमिकेने निष्ठावंतांमध्ये नाराजी

पिंपरी – “पुत्रासाठी वाट्टेल ते’ अशी भूमिका घेत पार्थ पवारांच्या विजयासाठी घरभेद्यांशी हात मिळवणीचा प्रकार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरू केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आजपर्यंत पक्षाशी निष्ठावंत राहिलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पवारांना विरोध नको म्हणून ही नाराजी सध्या तरी छुप्या पातळीवरच आहे. मात्र असाच प्रकार पुढेही राहिल्यास नाराजीचा उद्रेक होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात लोकसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र निवडणूक लढवित असल्याने या मतदारसंघाकडे देशासह राज्याचे लक्ष लागले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात घाटाखालचे तीन आणि घाटावरचे तीन असे सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड शहरावर अजित पवार यांचे तब्बल 15 वर्षे अबाधित वर्चस्व होते.

तथापि, गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील त्यांच्या सत्तेला सुरुंग लागला. विधानसभे पाठोपाठ महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे पवारांची शहरावरची सद्दी संपुष्टात आली होती. पवारांची सत्ता शहरावर पुन्हा येवू न देण्यासाठी स्थानिक काही मंडळींनी आपली ताकद पणाला लावून काम केले होते. नको बारामती, नको भानामती, असाही प्रचार झाला. सत्तेतून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादीचे अनेक शिलेदार भाजपात गेले आहेत. विशेषत: ज्यांना अजित पवार यांनी राजकीय आणि आर्थिक ताकद देवून मोठे केले त्यांचा यामध्ये मोठा समावेश आहे. आता पार्थ पवार मावळमधून उभे ठाकल्याने अजित पवार यांनी शहरात लक्ष केंद्रित केले आहे.

नाकारलेल्यांचा गोतवळा “पार्थ’सोबत

ज्यांना पक्षाने आणि मतदारांनी नाकारले अशाच लोकांचा गोतावळा सध्या पार्थ पवार यांच्यासोबत असल्याचीही नाराजी व्यक्त होत आहे. ज्यांनी पक्षविरोधी कारवाया गेल्या काही वर्षांत केल्या. ठराविक स्थानिक नेत्यांना साथ देवून अजित पवारांना विरोध केला असेही काहीजण फोटोसाठी आणि स्वार्थासाठी पुन्हा पार्थ यांच्यासोबत दिसू लागले आहेत. ज्यांनी अजित पवारांना साथ दिली आजही शहरात ताकद टिकवून ठेवली त्यांच्याकडे पार्थ पवारांचेही दुर्लक्ष असल्याचे राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

विशेष बाब म्हणजे आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी त्यांनी आतापासून जंग जंग पछाडण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांची त्यांना मोठी साथ आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळमध्ये राष्ट्रवादीची आजही मोठी ताकद आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसनेही पार्थच्या उमेदवारीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. निष्ठावंत आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते साथ देत असताना सध्या वेगळाच प्रकार सुरू झाल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे.

ज्या लोकांनी साथ सोडली त्याच लोकांना सध्या जवळ करण्याचा प्रकार राष्ट्रवादी आणि विशेषत: अजित पवार यांनी चालविला आहे. ज्यांनी घरभेदीपणा केला, त्यांनाच चुचकारण्याचा आणि निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरू लागली आहे.

अजित पवार यांच्या समोर जाहीरपणे ही नाराजी व्यक्त करण्याची ताकद कोणी दाखविली नसली तरी छुप्या पद्धतीने आपल्या नाराजीला वाट मोकळी करून देण्याचा प्रकार सुरू आहे. राष्ट्रवादीचा यापुर्वीही असाच कारभार सुरू होता. जे लोक आत-बाहेर करायचे पक्ष सोडून जायचे, अपक्ष म्हणून लढायचे त्यांनाच पक्षात मानाचे स्थान दिले जायचे.

आता पुत्र प्रेमापोटी अजित पवार यांनी असाच प्रकार सुरू केल्यामुळे निष्ठावंत गटातून नाराजी व्यक्त होत आहे. ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारा विरोधात निवडणुका लढविल्या, राष्ट्रवादीला खच्ची केले, पदे मिळूनही गद्दारी केली अशांनाच जर जवळ करायचे तर निष्ठेला काहीच महत्त्व नाही का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

स्थानिक आणि निष्ठावंतांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती ती न मिळाता पार्थ यांना उमेदवारी दिली तरी नाराज न होता निष्ठावंतांनी काम सुरू केले. असे असतानाही जो प्रकार सुरू आहे तो बंद होणे गरजेचे आहे. निष्ठावंतांच्या ताकदीवर निश्‍चित विजय मिळू शकतो, याची खात्री असतानाही घरभेद्यांना पुन्हा जवळ करू नका, त्यांना जवळ केल्यास मॅच फिक्‍सीग होवू शकते, असा इशाराही काहीजणांनी दिला आहे.

पार्थ-जगताप भेटीने भुवया उंचावल्या

ज्या लक्ष्मण जगताप यांनी कोणतेही कारण नसताना राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षाला जवळ केले, त्या लक्ष्मण जगतापांचे पार्थसोबत हस्तांदोलन हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीत काही लोकांची अडचण झाली आहे. त्यांना नाईलाजास्तव पार्थ यांना मदतच करावी लागणार आहे कारण ज्यांचे श्रीरंग बारणे हे राजकीय विरोधक आहेत. त्यांना ते मदतच करणार नसल्याने राष्ट्रवादीने अथवा अजित पवारांनी स्वत:हून अशा लोकांची मदत मागण्याची गरजच काय? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)