#लोकसभा2019 : आता उत्सुकता मावळ लोकसभेच्या निकालाची

मतमोजणीसाठी उरले अवघे 10 दिवस; विजयावर समर्थकांच्या पैजा

पिंपरी – लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होवून आज 13 दिवस उलटले असून मतमोजीसाठी आणखी दहा दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र समर्थकांनी विजयासाठी आतापासून पैजा लावण्यास सुरुवात केली असून तर काहीजणांनी देवदर्शन करत नवस बोलण्यास चालू केले आहे. मतदारराजाने कोणाच्या बाजुने कौला दिला हे मात्र येत्या 23 तारखेलाच समोर येणार आहे. त्यामुळे समर्थकांची धाकधुक वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या देशातील चौथ्या आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यात मावळसाठी मतदान झाले. महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांमध्ये या ठिकाणी चुरशीची लढत झाली. महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे यांनी आघाडीकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी लढत दिली. याशिवाय वंचित आघाडीसह एकुण 21 उमेदवार रिंगणात होते. सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही लढत अंतिम टप्प्यात तिरंगी झाल्याचे सांगण्यात येत आहे. महायुती, आघाडी आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांनी सुरुवातीपासून प्रचारात जोर लावत विजयासाठी ताकद लावली होती.

गतवेळी सन 2014 मध्येही या मतदारसंघात तिरंगी लढत होवून बारणे हे विजयी झाले होते. मोदी लाटेचा फायदा बारणे यांचा चांगलाच झाला होता. यावेळी मोदी लाटेचा म्हणावा तितकासा प्रभाव नसल्याने तसेच दस्तुरखुद्द शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र लढत देत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस एकसधं दिसली. तर नेहमीच एकत्र लढत देणारे युतीचे शिलेदार यावेळी विस्कळीत दिसले. बारणे आणि पार्थ यांच्यातच खरी लढत असली तरी वंचित आघाडीचे राजाराम पाटील किती मते घेतात यावरच पार्थ पवार यांचा विजय असू शकतो. पिंपरी मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या हक्काचा समजला जात असला तरी या ठिकाणी वंचितने मोठ्या प्रमाणात मते घेतल्याचे समोर आल्यामुळे पार्थ पवार यांच्या विजयाला वंचित धक्का पोहोचविणार का? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

मोदी लाटेचा अपेक्षित प्रभाव नसल्याने तसेच विस्कळीत असलेले युतीचे घटकपक्ष आणि गत पाच वर्षांत मावळचा अपेक्षित न झालेला विकास याचा फटका बारणे यांना बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असली तरी विजयाबाबत शिवसेना निर्धास्त आहे. शिवसेनेच्या बारणे यांचा विजय नक्की असल्याचे सांगत या पक्षातील अनेकांनी पैजाही लावल्याचे सांगण्यात येत आहे. तर किमान एक लाखापेक्षा अधिक मताधिक्‍याने पार्थ यांचा विजय निश्‍चित असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.

… तर यशाला हुलकावणी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी कधी नव्हे तेवढी या निवडणुकीत एकी दाखवित काम केले. सुरुवातीपासून विस्कळीत असलेल्या या पक्षाचा शेवटच्या चारपाच दिवसांत सुर जुळला आणि यंत्रणा ताळ्यावर आली. यशसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा वापर करत यश मिळविण्याच्या जिद्दीने उतरलेल्या राष्ट्रवादीला यशाची खात्री असली तरी वंचितने घेतलेल्या मतांवर विजयाची बरीच गणिते अवलंबून आहेत. वंचितने राष्ट्रवादीच्या हक्काची मते अपेक्षेपेक्षा जास्त घेतल्यास राष्ट्रवादीच्या यशाला हुलकावणी बसू शकते, असा एक सूर मतदारसंघात ऐकायला मिळत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)