मेस्सीच्या हॅट्रीकने बार्सिलोनाचा सहज विजय

नवी दिल्ली  – ला लिगा फुटबॉलमध्ये मेसीच्या हॅट्‌ट्रीकमुळे बार्सिलोनाने रेयाल बेटिसवर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉल लीगच्या सलग दुसऱ्या विजेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली आहे. 28 सामन्यांतून 20 विजय, दोन पराजय आणि सहा बरोबरींसह त्यांचे एकूण 66 गुण झाले आहेत. बार्सिलोनाचे अद्याप 10 सामने बाकी आहेत. दुसऱ्या स्थानावरील ऍटलेटिको माद्रिदपेक्षा (28 सामन्यांतून 56 गुण) ते 10 गुणांनी पुढे आहेत. मेस्सीला लुइस सुआरेझने एक गोल झळकावत सुरेख साथ दिली. बार्सिलोनाचा पुढील सामना शनिवारी इस्प्यान्योलविरुद्ध होणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच चेंडूवर ताबा मिळवत बार्सिलोनाने रेयाल बेटिसच्या बचावपटूंवर दडपण आणले. 18व्या मिनिटाला फ्री किक वर मेस्सीने बार्सिलोनासाठी पहिला गोल नोंदवला. यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, कोणालाही गोल करता न आल्याने मध्यांतरापर्यंत बार्सिलोनाने 1-0 अशी आघाडी कायम राखण्यात यश मिळवले.

मध्यांतरानंतर लगेचच दुसऱ्या (47व्या) मिनिटाला मेस्सीने सुआरेझच्या पासवर दुसरा गोल झळकावता बार्सिलोनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर, यानंतर 63व्या मिनिटाला सुआरेझनेदेखील तब्बल 25 यार्डावरून वैयक्तिक पहिला गोल करीत बार्सिलोनाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.

यावेळी लोरेन मोरोनने 82व्या मिनिटाला रेयाल बेटिससाठी एकमेव गोल नोंदवून पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु हॅट्ट्रिकसाठी उत्सुक असलेल्या मेस्सीने 85व्या मिनिटाला वैयक्तिक तिसरा व संघासाठी चौथा गोल झळकावत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. चौथा गोल झळकावताच स्टेडियममधील सर्व प्रेक्षकांनी मेस्सीला उभे राहून मानवंदना दिली.

दरम्यान सुआरेझला या सामन्यात उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला यातून सावरण्यासाठी किमान दोन आठवडयांचा काळ लागणार आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या चीन चषकामधील उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीत सुआरेझ उरुग्वेचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही.

यंदाच्या हंगामातील मेस्सीची ही चौथी, तर, ला लिगामधील 33वी, आणि त्याच्या कारकीर्दीतील तब्बल 51वी हॅट्‌ट्रीक ठरली. तर, यंदाच्या क्‍लबस्तरीय स्पर्धामध्ये मेस्सीने नोंदवलेल्या 39 गोलपैकी 29 गोल हे त्याने ला लिगामध्येच झळकावले आहेत.

“यापूर्वी मला चाहत्यांकडून अशा प्रकारची मानवंदना कधीच मिळाली नव्हती. रेयाल बेटिसचा बचाव भक्कम आहे, त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध लगावलेल्या या हॅट्‌ट्रीकमुळे मी फार आनंदी आहे. संघातील सर्वच खेळाडूंना सलग दुसऱ्या विजेतेपदाची चाहूल लागली आहे.

-लिओनेल मेसी, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)