बँकेवर दरोड्याच्या प्रयत्नातील कर्नाटकमधील टोळीला कोल्हापुरात अटक

कोल्हापूर – जिल्ह्यातील कागल इथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेसह करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या राष्ट्रीयीकृत बँकेवरील दरोड्याच्या तयारीत असलेल्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सराईत टोळीच्या कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने पहाटे मुसक्या आवळल्या. यावेळी झालेल्या झटापटीत एक जण पसार झाला. दरोड्यासाठी लागणार्‍या शस्त्रांसह कार असा दोन लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर कागलजवळ उड्डाणपुलावर थांबलेल्या कारमधील तरुणांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधला. डॉ.देशमुख यांच्या सूचनेनुसार कागलचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, पोलिस उपनिरीक्षक दादाराजे पवार, विजय कोळी, शिवाजी खोराटे, संजय पडवळ, रफिक आवळकर यांनी छापा टाकून मोटारीसह पाच जणांना ताब्यात घेतले; मात्र झटापटीत एक पसार झाला.

कारच्या झडतीत ऑक्सिजन सिलिंडर, घरगुती वापराची गॅस सिलिंडर टाकी, गॅसगन, दोन लोखंडी कटावण्या, कटर, लायटर, हेल्मेट, बॅटरी, माकड टोपी, हातमोजे, जर्किन 35 लिटरचे रिकामे कॅन, मोटारीच्या नंबर प्लेट, मोबाईल हँडसेट असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.जिफान शाबुद्दिन अन्‍निवाले , मंजुनाथ बसवराज पाटील , रफिक खतालसाब पठाण, यासीन उस्मान धारवाडकर अशी त्यांची नावे आहेत. पलायन केलेल्या संशयिताच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत, असे स्थानिक गुन्हे अन्वेेषणचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.

टोळीने महिन्यापूर्वी गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडमुडशिंगी येथील राष्ट्रीयीकृत बँकेसह कागल येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची रेकी केली होती. दोन बँकांवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात ही टोळी होती, अशीही माहिती चौकशीतून निष्पन्‍न झाली आहे, असेही तानाजी सावंत यांनी सांगितले.तसेच या टोळी कडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)