बॅंका ‘जेट’मधील बरेच भांडवल स्वतःकडे घेणार

नवी दिल्ली – खेळते भांडवल नसल्यामुळे अडचणीत असलेल्या जेट एअरवेजचे बरेच भागभांडवल बॅंका स्वतःकडे घेणार आहेत. हे भागभांडवल नवीन प्रवर्तक मिळेपर्यंत बॅंका स्वतःकडे ठेवण्याची शक्‍यता आहे. नवा प्रवर्तक येण्यास किमान दोन ते तीन महिने लागू शकतात. तोपर्यंत हे भाग भांडवल बॅंका स्वतःकडे ठेवतील. नवा प्रवर्तक मिळाल्यास हे भाग भांडवल नव्या प्रवर्तकांना बॅंका देतील असे समजले जात आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून जेट एअरवेजला कसे पुनरुज्जीवित करायचे या विषयावर करदात्या बॅंका विचार करीत आहेत. जेट एअरवेज वर 8200 कोटी रुपयांचे कर्ज आहे. मार्च अखेरीस या कर्जाचा 1700 कोटी रुपयांचा हप्ता भरायचा आहे.त्या अगोदर कंपनीला काही प्रमाणात खेळते भांडवल देण्याच्या शक्‍यतेवर विचार केला जात आहे.

जर संबंधित भागभांडवल कर्जदात्या बॅंकाकडे आले तर नवा प्रवर्तक मिळणे अधिक सोयीचे होणार असल्याचे बोलले जाते. जेट एअरवेज भारतात गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत असून या कंपनीचे 51 टक्के भागभांडवल कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल यांच्याकडे आहेत तर एतिहाद एअरवेजकडे 24 टक्के भाग भांडवल आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला या विषयावर स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनिश कुमार, नागरी विमान वाहतूक सचिव प्रदीप कुमार खरोला, पंतप्रधान कार्यालयातील सचिव नृपेंद्र मिश्रा आणि इतरांनी जेट एअरवेज मधील घडामोडीबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांना माहिती दिली होती. सध्या जेट एअरवेजची केवळ 30% विमाने कार्यरत आहेत. निवडणुकीच्या काळात ही कंपनी दिवाळखोरीत गेली तर त्याचा विमान वाहतूक व्यवसायावर आणि कामगारावर परिणाम होणार आहे. त्यामुळे ही कंपनी दिवाळखोरीत जाऊ नये यासाठी प्रयत्न चालू आहे. जर पगार दिला नाही तर 1 एप्रिल पासून संप करण्याचा इशारा कंपनीच्या पायलटनी दिलेला आहे.

दरम्यान, जेट एअरवेजच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याची सूचना स्टेट बॅंकेने प्रवर्तक नरेश गोयल यांना केली आहे. त्याचबरोबर या नागरी हवाई वाहतूक कंपनीचे कार्यकारी संचालक गौरांग शेट्टी व स्वतंत्र संचालक नसीम झैदी यांनाही कंपनीचे संचालक मंडळ सोडण्यास सांगितले आहे.

बॅंकांचे कर्जाच्या परतफेड थकीत असलेल्या जेट एअरवेजला दिलेल्या कर्जाचे रूपांतर समभागांमध्ये केल्यानंतर स्टेट बॅंकेला जेट एमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले. कंपनीतील दुसरी मोठी भागीदार संयुक्त अरब अमिरातीतील एतिहाददेखील या कंपनीतील आपला भागभांडवली हिस्सा विकू पाहात आहे. त्यामुळे स्टेट बॅंकेच्या कंपनीतील भागीदारीला महत्त्व प्राप्त झाले आहे. एतिहादने हिस्सा विकून बाहेर पडण्याचा मानस व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)