जेट एअरवेजला वाचवा; केंद्राची सरकारी बॅंकांना सूचना?

नवी दिल्ली – जेट एअरवेजसमोर खेळत्या भांडवलाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे ही कंपनी दिवाळखोरीत निघते की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. निवडणुकीच्या काळात विमान कंपनी बंद होणे बरोबर होणार नाही, असे सरकारला वाटते. या कंपनीला नवा खरेदीदार मिळेपर्यंत सरकारी बॅंकांनी कंपनी वाचविण्याचा प्रयत्न करावा, असे सरकारचे मत असल्याचे कळते.

आज एकूणच नागरी विमान वाहतूक या विषयावर एक बैठक झाली. गेल्या काही आठवड्यापासून या विमान कंपनीला कर्ज देणाऱ्या बॅंका सरकारला आठवड्याच्या पातळीवर माहिती देताहेत. आगामी काळातही या संदर्भात घडामोडीची माहिती बॅंका सरकारला देणार आहेत. जेट एअरवेजला कसे वाचवावे यासंदर्भात तपशिलात चर्चा झाली. जेट कंपनीची अवस्था ठीक होईपर्यंत तसेच कंपनीला नवा खरेदीदार मिळेपर्यंत बॅंकांनी या कंपनीला मदत करावी. त्याचबरोबर राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधीनेही मदत करण्याचा प्रयत्न करावा असे सरकारने सांगितले असल्याचे बोलले जाते. जेट एअरवेजवर आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

बॅंका, पुरवठादार, कर्मचारी, विमानाचे भाडे इत्यादी आघाडीवर पेमेंट देण्यासंदर्भात जेट एअरवेज अडचणीत आलेली आहे. विमान कंपनी दिवाळखोरीत आल्यास त्याचा गुंतवणुकीच्या वातावरणावरही परिणाम झाला आहे. त्याचबरोबर वेगाने वाढणाऱ्या नागरी विमान वाहतुकीवरही याचा परिणाम झालेला आहे. अगोदरच बऱ्याच विमान कंपन्यांनी त्यांचे भाडे वाढविलेले आहे. जर सरकारच्या इच्छेप्रमाणे सर्व काही झाले तर सहकारी बॅंका या विमान कंपनीचे एकतृतीयांश भागभांडवल खरेदी करू शकतात. दरम्यानच्या काळात नवा खरेदीदार शोधण्याचे प्रयत्न चालू राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)