यावेळी संधी गमवायची नव्हती – स्मृती मंधना

नेपिअर  -मागील काही सामन्यात मला चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नव्हता. यावेळी मला मोठी खेळी करण्याची संधी गमवायची नव्हती असे, स्मृती मंधनाने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. न्यूझीलंड महिला संघाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावीत भारताला विजय मिळवून देण्यात मंधनाने मोलाचा वाटा उचलला होता. पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात 193 धावांचा पाठलाग करताना मंधनाने 104 चेंडूत 105 धावांची शतकी खेळी साकारत जेमिमा रॉड्रीग्झसह 190 धावांची सलामी दिली होती. मोठा फटका खेळून सामना संपवण्याच्या मोहात तिने आपली विकेट गमावली. जेमिमाने नाबाद 81 धावा करत भारताला लक्ष्य गाठून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढे बोलताना मंधना म्हणाली, मी मागील बऱ्याच सामन्यात 70 -80 या धावसंख्येच्या आसपास बाद होत होते. त्यामुळे या धावसंख्येजवळ पोहोचल्यास मी स्वतःला ठणकावून सांगितले की, विजय नजीक असल्याने सध्या मोठे फटके मारण्याची गरज नाही. एकेरी-दुहेरी धाव घेत डावाला आकार देता येईल आणि चांगल्या सुरुवातीचे शतकात रूपांतरीत करता येईल. जे ठरवलेले ते केल्याने मी समाधानी आहे. परंतु, संघाला विजय मिळण्यासाठी तीन धावा कमी असताना मी बाद झाले. सामना संपवून नाबाद राहिले असते तर आणखी जास्त आनंद झाला असता, असेही ती म्हणाली.

खेळपट्टीविषयी बोलताना मंधना म्हणाली, येथील खेळपट्टी फलंदाजीस पोषक होती. त्यामुळे आम्ही सुरुवातीला खराब चेंडूंचा समाचार घेण्याची रणनीती आखली होती. त्यांच्याकडे चांगल्या जलदगती गोलंदाज असल्याने सुरुवातीला सावध खेळ करण्यावर आमचा भर होता. त्यानंतर चेंडूची चमक कमी झाल्यावर आम्ही धावगती वाढवण्यावर भर दिला.

मी न्यूझीलंडमध्ये प्रथमच खेळात होते. येथील वातावरणात चेंडू किती वळतो आणि उसळी घेतो याचा काहीच अंदाज नव्हता. त्यामुळे पुरुष संघाचा सामना पहिला आणि आमच्या सामन्यातील न्यूझीलंडच्या डावातील अनुभवावर काही अंदाज बांधले. पण, काहीही वेगळे करण्यापेक्षा साधा खेळ करत सरळ बॅटने खेळण्याचा माझा निर्धार होता, असेही ती म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)