भारतीय संघाच्या हॉकी प्रशिक्षकाची घोषणा लवकरच

File photo

नवी दिल्ली  -सध्या भारतीय संघ मलेशिया येथील इपोह येथे अझलन शाह हॉकी स्पर्धेत खेळत असून या स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरी गाठून चांगली कामगिरी केली आहे. भारताच्या या कामगिरीचे कौतुक यासाठी होत आहे की सध्या भारतीय संघ या स्पर्धेत प्रशिक्षक आणि अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळतो आहे. त्यातच संघाच्या प्रशिक्षकाचे नाव अंतिम झाले असून आगामी काही दिवसात त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्रॅहम रीड लवकरच भारतात येऊन भारताच्या हॉकी संघात प्रशिक्षकपदी रुजू होण्याची शक्‍यता आहे. हॉकी इंडिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांनीही या पदासाठी ग्रॅहम रिड योग्य असल्याचे नमूद केले आहे. हॉकी इंडिया आणि साई यांची बैठक झाली असून सूत्रांच्या माहितीनुसार 54 वर्षीय रीड यांच्या नेमणुकीची घोषणा पुढील काही दिवसांत होईल.

क्रीडा मंत्रालयाकडून रीड यांच्या नावावर अधिकृत शिक्‍कामोर्तब झाले की मीडियापुढे घोषणा होण्याची शक्‍यता आहे. रीड यांच्याखेरीज वॉरेन बर्मिंगहॅम, ब्रेंट लिव्हमोर आणि जय स्टासी हेदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. विशेष म्हणजे हे चारही ऑस्ट्रेलियन आहेत. क्रीडामंत्रालयाकडे या चौघांची नावे आणि माहिती असून अखेरच्या क्षणी भारतीय संघासाठी इतर तिघांपैकी एकाची नेमणूकदेखील होऊ शकते असे हॉकी इंडियाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

ग्रॅहम रीड हे ऍमस्टरडॅम हॉकी क्‍लबचे प्रशिक्षक म्हणून काम बघत होते; पण गेल्याच आठवड्यात एचजीसी लीगमध्ये या संघाला 2-8 असा मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे रीड यांची प्रशिक्षकपदावरून गच्छंती झाली. रीड यांची भारतीय हॉकीमधील रुची वाढत असल्याने ऍमस्टरडॅम क्‍लब नाराज होता. रीड यांनी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षकपद भूषविले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातच ऑस्ट्रेलियाने दोनवेळा चॅम्पियन्स ट्रॉफी तर 2014 मध्ये ग्लास्गो राष्ट्रकुल जिंकले आहे. 1992 च्या ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताने त्यांनी रौप्य, तर 1990च्या वर्ल्डकपमध्ये ब्रॉंझपदकाची कमाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)