पिंपरी : अग्निशामक दलाच्या मदतीला ‘वॉटर टॉवर कॅनल’

-रिमोटने ऑपरेट होणार

-15 हजार लिटर पाणी क्षमता

-दुरुनच विझवता येणार आग

-अत्याधुनिक यंत्रणेमुळे आग विझवणे झाले सोपे

-शर्मिला पवार

पिंपरी – सातत्याने आगीच्या घटनांमुळे कुख्यात असलेला कुदळवाडी व चिखली परिसर नागरिकांसोबत अग्निशामक विभागाची डोकेदुखी ठरत आहे. भंगारच्या गोदामांना नेहमीच लागणारी आग आणि अतिक्रमणामुळे आगीपर्यंत पोहचण्यासाठी अग्निशामक विभागाला करावी लागणारी कसरत नित्याचीच बाब बनली होती. येथील परिस्थिती काही केल्या बदलत नसल्याने येथील आग विझवण्यासाठी आता अग्निशामक विभागाकडे अत्याधुनिक गाडी आली आहे. या गाडीतील आधुनिक सुविधेमुळे कुदळवाडी येथील आग अवघ्या 15 मिनिटात विझवणे शक्‍य झाले आहे.

अग्निशामक दलाचे प्रमुख किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी अग्निशामक दलासाठी खूप मोठी मदत ठरली आहे. त्यातल्या-त्यात कुदळवाडी व चिखली येथे होणाऱ्या आगीच्या घटना या त्रासदायक असतात कारण तेथे अरुंद रस्ते आहेत घटनास्थळी गाड्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आग लवकर विझवता येत नव्हती. मात्र या नवीन वॉटर टॉवर कॅनल या गाडीमुळे ही आग विझवणे अवघे 15 मिनिटांचे काम झाले आहे.

कारण या गाडीला रिमोट द्वारे ऑपरेट करता येणारा पाण्याचा बंब आहे. ज्याची उंची ही 16 मीटर एवढी आहे. त्यामुळे कुदळवाडी येथे सोमवारी (दि.18) रात्री लागलेली आग ही मुख्य रस्त्यावर नवीन गाडी उभी करुन आग अवघ्या काही मिनिटात विझवता आली. अशा तीन गाड्या 15 दिवसांपूर्वीच खरेदी केल्या आहेत. त्यातील दोन गाड्या पिंपरी अग्निशानक दालात तर एक गाडी ही चिखली अग्निशामक केंद्रात कार्यरत असणार आहे. या गाड्यांमुळे पिंपरी-चिंचवड अग्निशामकदलाकडे एकूण 23 गाड्या झाल्या आहेत.

काय आहेत वैशिष्ट्ये

या गाडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गाडीची पाण्याची क्षमता 15 हजार लिटर आहे. ज्यामुळे आग विझवताना पाणी पुरेसे होते. या गाडीचा पाण्याच्या बंबाची उंची ही 16 मीटर आहे. पाण्याचा मारा करणारा पाईप 90 अंश कोन असा वाकवणे शक्‍य आहे. तसेच संपूर्ण गाडी ही रिमोट ऑपरेटिंग आहे, जवानाला ही गाडी 50 मीटर लांबून ऑपरेट करणे शक्‍य आहे. यामुळे स्वतः सुरक्षित ठिकाणी उभे राहून काम करणे शक्‍य आहे.

परिसरात वर्षभरात 69 आगीच्या घटना

चिखली कुदळवाडी या परिसरात अनधिकृत भंगारची गोदामे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात तेथे आगीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. फेब्रुवारी 2016 मध्ये भीषण आगीत याच परिसरातील सुमारे 25 दुकाने जळून खाक झाली होती, ज्यामध्ये 80 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर महापालिकेला जाग आली. या गोदामांचे सर्वेक्षण झाले ज्यामध्ये सुमारे दीड हजार गोदामे ही अनधिकृत असल्याचे सांगितले गेले. मात्र तरीही येथील गोदामावर कोणतीही कारवाई झाली नाही. आगीच्या घटना मात्र सुरुच आहेत. त्यानुसार 2018-19 या वर्षात कुदळवाडी-चिखली परिसारत एकूण 69 आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून चिखली येथे स्वतंत्र अग्निशामकदलाची निर्मिती करण्यात आली. मात्र तेवढ्यावर हा प्रश्‍न सुटणारा नव्हता. अखेर अग्निशामक दलाने त्यावर तात्पुरता का असेना तोडगा काढला आहे. मात्र महापालिका या अनधिकृत गोदामांवार कारवाई कधी करणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)