मॅडम, मोदींकडून 15 लाख कधी मिळणार!

मतदान हेल्पलाईनवर माहितीपेक्षा मनोरंजनच अधिक 

हेल्पलाईनवरील संवादावर आयोगाला ठेवायचेय कान

-प्रदीप पेंढारे

नगर – आचारसंहिता कधी लागू होणार आहे… कोणत्या पक्षाची हवा आहे… टॅंकर कधीपासून सुरू होतील… अण्णा हजारेंचे उपोषण कधी सुटणार आहे… 15 लाख रुपये खात्यावर कधी जमा होतील… सहा हजार रुपये कधी जमा होतील, अशा विविध प्रश्‍नांची विचारणा होत आहे जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या मतदान हेल्पलाईनवर! त्यातच निवडणूक आयोगाने हेल्पलाईनवरील प्रत्येक दिनाची आणि संवादाची माहिती देणे अनिवार्य केले आहे. उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी तसा नमुना देत आदेशच काढला आहे.

मतदारांना त्यांच्या मतदानाविषयी माहिती अधिक सोप्यापद्धतीने मिळावी यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात मतदान हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मतदान दिन, 25 जानेवारीपासून ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मतदार देखील या हेल्पलाईनचा फायदा घेत आहेत.

परंतु, अलीकडच्या काळात ही हेल्पलाईनवरील संवाद मनोरंजनाचा भाग बनली आहे. मतदार मतदानाच्या माहितीऐवजी वेगळेच प्रश्‍न विचारून हेल्पलाईनवरून आनंद घेत आहेत. विशेष म्हणजे, हेल्पलाईनवरील मॅडम समोरच्याशी हसतमुखानेच समोरच्यांशी संवाद साधत आहेत. आचरसंहिता कधी लागू होणार आहे… कोणत्या राजकीय पक्षाची हवा आहे… पिण्याचा पाण्याचा टॅंकर आलेला नाही, तो कधी येईल… अण्णा हजारेंचे उपोषण कधी सुटणार आहे… मोदींकडून 15 लाख रुपये कधी जमा होणार आहे, अशा विचित्र प्रश्‍न विचारून या हेल्पलाईनवर संवाद साधणारे मनोरंजन करून घेत आहेत. जिल्हा प्रशासनाची ही हेल्पलाईन डोकेदुखी ठरत आहेत.

मतदान प्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणाचा घाट!

निवडणूक आयोगाच्या आणखी एक फतव्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या 10 टक्के मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे थेटप्रेक्षपण (वेबकास्टिंग) करायचे आहे. नगर जिल्ह्यातील मतदान केंद्राचा हिशोब केल्यास येथील 400, राज्यातील दहा हजार आणि देशातील सव्वा लाखांच्यावरील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे थेटप्रेक्षपण करावे लागणार आहे. हे सर्व करण्यासाठी वेगळी अशी यंत्रणा नाही. आहे तेवढ्याच मनुष्यबळात काम करायचे आहे. एवढे मोठे आव्हान असतानाच निवडणूक आयोगाचे अजूनही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चित्रविचित्र आणि आव्हानात्मक फतवे
निघतच आहेत.

मतदान हेल्पलाईनवर हा संवाद डोकेदुखी ठरत असतानाच, निवडणूक आयोगाने या हेल्पलाईनवरील प्रत्येक कॉलची नोंद घेण्याचा फतवा काढून जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहेत. या नोंदी विहीत नमुन्यामध्ये घेत त्याचा अहवाल दररोज सायंकाळी ई-मेलद्वारे आयोगाकडे पाठवायचा आहे.

उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी यासाठीचा नऊ फेब्रुवारीला लेखी आदेश काढला आहे. या आदेशाबरोबर संवाद नोंदीसाठी नमुना देखील दिला आहे. या आदेशानुसार मतदारांच्या तक्रारी, त्यांना दिलेली माहिती, मतदारांचा प्रतिसाद आणि मतदारांनी दिलेला आणि सांगितलेल्या सल्ल्याची नोंद करायची आहे. या आदेशानुसार हेल्पलाईनवर सध्या होत असलेल्या मनोरंजनात्मक संवादाच्या देखील नमुन्यानुसार नोंदी घ्यायचा हा प्रश्‍न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.

दरम्यान, जिल्हा निवडणूक प्रशासनासमोर लोकसभा निवडणुकीचे आव्हान आहे. त्याला समोरे जाताना अनेक प्रश्‍नांचा गुंता आहे. मतदार नोंदीपासून याद्या अद्यावत करण्यापर्यंत सर्वच बाजू संभाळावी लागत आहे. त्यातच निवडणूक आयोगाचे निघत असलेल्या चित्रविचित्र फतव्यांना देखील तोंड द्यावे लागत आहे. हेल्पलाईनवरील संवादाच्या नमुन्यानुसार नोंदी करणे हे देखील आता आव्हानच ठरणार आहे.

या नोंदीबरोबर हेल्पलाईन टेलिफोनच्या मेन सर्व्हर जोडून त्याचे कनेक्‍शन दिल्लीच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत द्यायचे आहे. यातच निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घाट घातला आहे. त्यातच आयोगाकडून निघत असलेले वेगवेगळे फतवे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे.

“चित्रविचित्र फतव्यांतून मतदारांच्या अधिकारांवर लक्ष ठेवण्याचा उद्योग निवडणूक आयोगाने सुरू केलेला दिसतो आहे. मतदान प्रक्रियेचे थेटप्रक्षेपण असो किंवा हेल्पलाईनच्या आडून मतदारावर लक्ष ठेवण्याची तयारी, हे सर्व लक्षणे तेच दर्शवते. ग्राहकाला सेवा देताना त्याची माहिती गोपनीयच ठेवली पाहिजे. तसा ग्राहकाचा अधिकारच आहे. यावर कोणीही गंडांतर आणू शकत नाही. कायद्याचे तसे संरक्षण आहे. निवडणूक आयोगाला दिलेली अतिस्वायत्ता ही मतदारांचे मतदानाविषयी अधिकार जपण्यासाठी दिलेली आहे. त्यांच्या अधिकारांवर घाला घालण्यासाठी नाही. यापेक्षा आयोगाने आचारसंहिता कायद्याची काटकोरपण अंमलबजावणी करण्याकडे लक्ष केंद्रीत करावे.
– अॅड. शिवाजी सांगळे, मानवी हक्क अभ्यासक, नगर.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)