64 वी राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धा : प्रिया, सिद्धी, अंजलीला सुवर्ण

पुणे – महाराष्ट्राच्या प्रिया धाबलिया, सिद्धी शिर्के, अंजली रानवडे यांनी भारतीय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित 64व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत आपापल्या गटातून सुवर्णपदकाची कमाई केली.

रोड व ट्रॅक प्रकारातील या स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली. ट्रॅकचे प्रकार म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातील वेलोड्रम स्टेडियममध्ये होत असून, रोड सायकलिंगचे प्रकार हिंजवडी फेज-2 आणि 3 भागात विप्रो कंपनी गेट ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दरम्यान एकेरी मार्गावर झाले. या स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलींच्या 18 किलोमीटर मास स्टार्ट प्रकारात मुंबईच्या प्रियाने 34 मिनिटे 37.81 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णयश मिळवले.

गुजरातच्या मुस्कान गुप्ताने (35 मि. 00.24 से.) रौप्यपदक, तर दिल्लीच्या बिसेशोरी चानू नाद्रेमने (35 मि. 00.34 से.) ब्रॉंझपदक मिळवले. प्रिया ही दहावीत शिकत असून, मागील तीन वर्षांपासून ती सायकलिंग करते आहे. गेल्या वर्षीच्या राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले होते. राष्ट्रीय स्तरावरील ही तिची पहिलीच स्पर्धा होती.

19 वर्षांखालील मुलांच्या 30 किलोमीटर मास स्टार्ट प्रकारात केरळच्या फ्रॅंक नेल्सनने बाजी मारली. त्याने हे अंतर 50 मिनिटे 40.34 सेकंदांत पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या ओंकार आंग्रेने (50 मि. 40.35 से.) रौप्यपदक, तर दिल्लीच्या एम. तनिष्कने (50 मि. 40.36 से.) ब्रॉंझपदक पटकावले. ओंकार हा पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीचा विद्यार्थी आहे. यानंतर 17 वर्षांखालील मुलांच्या 24 किलोमीटर मास स्टार्ट प्रकारात दिल्लीच्या अर्षद फरिदीने (41 मि. 07.54 से.) सुवर्णपदक मिळवले. महाराष्ट्राच्या हनुमान चोपडेचे सुवर्णयश थोडक्‍यात हुकले. त्याने 41 मि. 07.55 सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले. हनुमान हा पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीचा विद्यार्थी आहे. दिल्लीच्या वैशान तोमरने (41 मि. 07.57 से.) ब्रॉंझपदक पटकावले.

यानंतर 14 वर्षांखालील मुलींच्या 6 किलोमीटर टाइम ट्रायल्समध्ये पुण्याच्या सिद्धी शिर्केने 10 मिनिटे 13.06 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. ठाण्याच्या सॅनुरी लोपेसने (10 मि. 35.78 से.) रौप्यपदक, तर झारखंडच्या तारा मिन्झने (11 मि. 20.64 से.) ब्रॉंझपदक मिळवले. 14 वर्षांखालील मुलांच्या 6 किलोमीटर टाइम ट्रायलमध्ये झारखंडच्या अर्णव श्रीने महाराष्ट्राच्या अथर्व पाटीलला मागे टाकले. अर्णवने 9 मिनिटे 01.30 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. अथर्वला (9 मि. 16.96 से.) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चंदिगडच्या जी. डोग्राने (9 मि. 19.99 से.) ब्रॉंझपदकाची कमाई केली.

यानंतर 17 वर्षांखालील मुलींच्या गटातील 12 किलोमीटर टाइम ट्रायल प्रकारात पुण्याच्या अंजली रानवडेने 19 मिनिटे 17.14 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णयश पटकावले. पुण्याच्या मानसी कमलाकरला (20 मि. 28.27 से.) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दिल्लीच्या इशिका गुप्ताने (21 मि. 59.13 से.) ब्रॉंझपदक पटकावले.  स्पर्धेत एकूण 17 राज्यातून 306 खेळाडू सहभागी झाले आहेत. यांसह पंच, अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा व्यवस्थापक, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी असा एकूण 400 जणांचा यात सहभाग आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)