सायकलिंग स्पर्धेत तनिष्क आणि कृष्णाला सुवर्णपदक

पुणे – महाराष्ट्राच्या तनिष्क भांड, कृष्णा हराळ यांनी भारतीय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित 64व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत आपापल्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

रोड सायकलिंगचे प्रकार हिंजवडी फेज-2 आणि फेज-3 भागात विप्रो कंपनी गेट ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दरम्यान एकेरी मार्गावर झाले. स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलींच्या 12 किलोमीटर मास स्टार्टमध्ये पुण्याच्या तनिष्क भांडने 21 मिनिटे 51.01 सेकंद वेळ नोंदवून महाराष्ट्राच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले. तनिष्क ही निगडीतील सिटी प्राईड स्कूलमद्ये इयत्ता 8 वीमध्ये शिकत आहे. मागील 4 महिन्यांपासून ती सायकलिंगचा सराव करीत असून यापूर्वी स्केटिंगमध्ये तिने राष्ट्रीय

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धेत अनेक पदके पटकावली आहेत. तर, पुण्याची मेहर पटेलने 22 मिनिटे 12.18 सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक आणि तमिळनाडूच्या श्रीमती जे.ने (23 मि. 00.42 से.) ब्रॉंझपदक पटकावले. मेहर ही महाराष्ट्राच्या संघातील सर्वात लहान वयाची खेळाडू असून ती निगडीतील सेंट ऊर्सूला या शाळेत इयत्ता 6 वीमध्ये शिकत आहे. मागील चार महिन्यांपासून मेहर सराव करीत असून दररोज दोन तास ती तळेगाव, कामशेत परिसरात रोडवर सायकलिंग करते.

स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलांच्या 24 किलोमीटर टाइम ट्रायल्स प्रकारात अहमदनगरच्या कृष्णा हराळने 34 मिनिटे 21.42 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. कृष्णा हा अहमदनगरपासून 30 किमीवर असलेल्या राळेगण म्हसोबा या गावातील आहे. यापूर्वी त्याने तीन शालेय राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पदके जिंकली आहेत. केरळच्या आदर्श व्ही. आर. याने 35 मिनिटे 18.05 सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या सौरभ काजळेला (35 मि. 27.244 से.) ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.

यानंतर 17 वर्षांखालील मुलांच्या 18 किलोमीटर टाइम ट्रायल्स प्रकारात हरियाणाच्या जितेंद्र अहलावतने महाराष्ट्राच्या जन्मेजय मुगलला मागे टाकले. जितेंद्रने 26 मिनिटे 44.706 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदकाची कमाई केली. नाशिकच्या जन्मेजयने 27 मिनिटे 01.203 सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले. तमिळनाडूच्या मिचेल जॉन्सनने 27 मिनिटे 07.923 सेकंद वेळ नोंदवून ब्रॉंझपदक पटकावले.

स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलींच्या 12 किलोमीटर टाइम ट्रायल्स प्रकारात केरळच्या धनम्मा चिचाकांडीने 18 मिनिटे 58.150 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदकाची कमाई केली. गुजरातच्या स्रिया मिस्त्रीने 20 मिनिटे 03.065 सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या प्रतीक्षा चौगुलेने (20 मि. 05.297 से.) ब्रॉंझपदक मिळवले.

यानंतर 14 वर्षांखालील मुलांच्या 12 किलोमीटर मास स्टार्टमध्ये झारखंडच्या नारायण महतोने बाजी मारली. त्याने 21 मिनिटे 19.410 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. महाराष्ट्राच्या विराज पाटीलने 21 मिनिटे 20.210 सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक पटकावले. तेलंगणच्या चिरायुश पटवर्धनने 21 मिनिटे 21.549 सेकंद वेळ नोंदवून ब्रॉंझपदकाची कमाई केली. म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात शुटिंग हॉलमध्ये पारितोषिक वितरण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)