#IPL2019 : संपूर्ण स्पर्धेत चांगले प्रदर्शन करण्याचे लक्ष्य

कोलकाता -सलग दोन सामन्यात वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सलग दोन अर्धशतके झळकाविल्याने आत्मविश्‍वास वाढला असून संपूर्ण स्पर्धेत चांगली फलंदाजी करण्याचे लक्ष्य असल्याचे मत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फलंदाज नितीश राणा याने पंजाब विरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे.

कोलकाताचा नियमित सलामीवीर सुनील नारायणच्या अनुपस्थितीत राणाने पहिल्या सामन्यात सलामीला येत हैद्राबाद विरुद्ध 68 धावांची खेळी केली होती तर दुसऱ्या सामन्यात पंजाब विरुद्ध चौथ्या क्रमांकावर खेळत त्याने 34 चेंडूत 63 धावा फटकाविल्या होत्या. त्यामुळेच तो या मोसमात दोन सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असून ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.

राणा म्हणाला, मी खूप लांबचा विचार करत नाही. मी मागील काही मोसमात सुरुवातीला चांगले प्रदर्शन केले होते; परंतु स्पर्धा मध्यावर आल्यानंतर माझ्या खेळात घसरण झाली होती. यावेळी संपूर्ण स्पर्धेत चांगले प्रदर्शन करण्याचे ध्येय आहे.
मागील काही महिन्यांत स्थानिक स्पर्धांमध्ये राणाचे प्रदर्शन चांगले राहिले नव्हते त्याने सईद मुश्‍ताक अली टी- 20 स्पर्धेत दहा सामन्यांत केवळ 147 धावा केल्या होत्या तर सहा रणजी सामन्यात 147 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने मुंबई येथील केकेआर ऍकॅडमी मध्ये सराव केला आणि त्याला त्याचा फायदा झाला. तो म्हणाला, तेथे मी फलंदाजीपेक्षा मानसीक कणखर होण्यावर जास्त भर दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)