#विधानसभा2019 : ओडिशावर पटनायक यांची पकड

सलग पाचव्या वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न

नवी दिल्ली -ओडिशाचे मुख्यमंत्रिपद गेली 19 वर्षे भूषविणारे नवीन पटनायक अजूनही मातृभाषा बोलताना अडखळतात. मात्र, लागोपाठ पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदासाठी ते रिंगणात उतरले आहेत. लोकसभेबरोबरच ओडिशा विधानसभेची निवडणूक होत आहे. गेली 19 वर्षे सत्तेत असलेल्या बिजू जनता दलासमोर भाजपने कडवे आव्हान उभे केले आहे.

सत्ताधारी पक्षातील अनेक नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. पटनायक यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. ओडिशा जिंकण्यासाठी भाजपनेही सारी ताकद पणाला लावली आहे. 147 सदस्यीय ओडिशा विधानसभेत सत्ताधारी बिजू जतना दलाचे 117 आमदार निवडून आले होते. तर लोकसभेच्या 21 पैकी 20 जागा सत्ताधारी पक्षाने जिंकल्या होत्या.
पटनायक हे राज्यात लोकप्रिय असलले नेते आहेत. माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या निधनानंतर नवीन यांनी राजकारणात प्रवेश केला होता. नवीन पटनायक यांची आई पंजाबी होती तर शिक्षण दिल्ली व परदेशातच झाले. यामुळे ओडिया भाषेचे ज्ञान सुरुवातीपासूनच कमी होते.

राजकारणात आल्यावर ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. वाजपेयी सरकारमध्ये ते मंत्री होते. 2000 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिजू जतना दल आणि भाजप युतीला बहुमत मिळाले. तेव्हापासून नवीनबाबू ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. ओडिया भाषा शिकण्यासाठी त्यांनी सुरुवातीला शिकवणी लावली होती. यामुळे काही प्रमाणात त्यांना ओडियामध्ये बोलता येते. शहरी भागात इंग्रजी किंवा हिंदीमध्ये भाषण करता येते. ग्रामीण भागात ओडिया भाषेतच बोलावे लागते. तेव्हा रोमन भाषेतून लिहून आणलेले भाषण ते वाचून दाखवितात.

ओडिया भाषेवर प्रभुत्व नसले तरी स्वच्छ कारभार ही नवीन पटनायक यांची जमेची बाजू मानली जाते. गेल्या 19 वर्षांच्या कारभारात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले, पण नवीन पटनायक यांच्यावर वैयक्तिक कधीच आरोप झाला नाही. वडील बिजूदांप्रमाणेच नवीन यांचीही प्रशासनावर घट्ट पकड आहे. एकदाच पटनायक हे परदेशात असताना त्यांचे सरकार पाडण्याचे पक्षातून प्रयत्न झाले. भारतात परतून त्यांनी प्रयत्न हाणून पाडला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)