90 हजार कोटींची निर्गुंतवणूक होणार

सार्वजनिक क्षेत्रातील दहा कंपन्या सरकारच्या रडारवर

नवी दिल्ली -आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील 10 उद्योगांचे आयपीओ बाजारात आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. टिहरी निगम इंडिया लिमिटेड (टीएचडीसीआयएल), रेलटेल आणि टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (टीसीआयएल) या कंपन्यांचा समावेश यात असून आर्थिक वर्षात 90 हजार कोटींच्या निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाने माहिती दिली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सरकारी हिस्सा कमी करून निर्गुंतवणूक वाढवण्याचा विचार असून या पार्श्वभूमीवर नव्या आर्थिक वर्षात 10 आयपीओ आणण्याची तयारी सुरू आहे, असे केंद्र सरकारच्या सार्वजनिक उद्योगांचे निर्गुंतवणूक विभागाचे सचिव अतनु चक्रवर्ती यांनी सांगितले. या शिवाय, सरकारतर्फे इक्विटी ट्रेडेड फंड (ईटीएफ) आणण्याची तयारी करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर निर्गुंतवणुकीकरणाची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्थिक वर्ष 2019-20 साठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 90 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10 हजार कोटींहून अधिक आहे. हिस्साविक्री, समभाग पुनर्खरेदी आणि ईटीएफ आदींच्या माध्यमातून 36 हजार कोटी रुपयांची रक्कम चालू आर्थिक वर्षात प्राप्त झाली आहे. मार्च 2019 च्या अखेरपर्यंत 44 हजार कोटी रुपये जमा करण्याचे सरकारचे धोरण आहे.

चालू आर्थिक वर्षात 80 हजार कोटी रुपयांचे लक्ष्य सहज गाठण्याचा विश्वास चक्रवर्ती यांनी व्यक्त केला. कोल इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आदींसह इतर सार्वजनिक उपक्रमांच्या समभाग पुनर्खरेदीतून 12 हजार कोटी रुपयांची निधी मिळणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)