कोल्हापूर – बहुचर्चित हत्याकांड ठरलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणात बाजू मांडण्यासाठी आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे. तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. संतोष पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारी वकील म्हणून आम्हाला उज्ज्वल निकम नको तर प्रदीप घरत यांची नियुक्ती करावी अशी मागणी बिद्रे कुटुंबीयांनी केली होती. 19 नोव्हेंबर 2018 रोजी बिद्रे कुटुंबियांना शासनाकडे आणि कोर्टाकडे ही मागणी केली होती.
अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणात सरकारच्या वतीनं प्रदीप घरत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर पत्रकार जे डे हत्याकांडातील आरोपी छोटा राजनला प्रदेशातून आणून शिक्षा लावली आहे. बिद्रे आणि गोरे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या खटल्याला गती देण्याची विनंती केली होती. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा खटला जलद गतीने चालवावा, अशी मागणी कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर प्रकरणाचा खटला एका वर्षात निकाली काढावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांच्या अथक प्रयत्नामुळे ही सरकारी वकील घरत यांची नियुक्ती करण्यास शासनाला भाग पडलं आहे.