नगर झेडपीच्या नवीन आरोग्य केंद्रांचे प्रस्ताव धूळखात

वर्षभरापासून 141 केंद्रांचे प्रस्ताव शासन दरबारी; रुग्णांचे हाल वाढले

नगर  – जिल्ह्यात नवीन आरोग्य केंद्र उभारण्याची आवश्‍यकता असल्याने तसेच शासनाकडून नव्या निकषानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे प्रस्ताव पाठविण्याच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 141 आरोग्य केंद्रांचे प्रस्ताव शासन दरबारी पाठविले आहेत. वर्ष झाले तरी या प्रस्तावांवर मात्र अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. आरोग्य केंद्रांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे धूळखात पडून आहेत.

जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन आरोग्य केंद्र उभारणे आणि अस्तित्वात असलेल्या केंद्रांच्या श्रेणीत वाढ करणे आवश्‍यक आहे. याचा विचार करून शासनाने आरोग्य केंद्रांबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानंतर तालुकास्तरावरुन आरोग्य केंद्रांचे प्रस्ताव पाठवण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे 20 तर उपकेंद्रांचे 121 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आले होते.

हे प्रस्ताव आरोग्य सेवा संचालनालयास सादर करण्यापूर्वी या प्रस्तावांसोबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती, सर्वसाधारण सभा आणि जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेचे ठराव करून ते शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावबरोबर जोडण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. त्यानंतर प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आले. आरोग्य विभागाने यावर अद्याप कार्यवाही केलेली नाही. प्रस्ताव पाठवूनही आता वर्षभराचा कालावधी लोटला आहे. तरीदेखील एकही प्रस्तावास मंजुरी मिळालेली नाही.

जिल्ह्यात नवीन आरोग्य केंद्रांची आवश्‍यकता असल्याने जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठवले आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार नव्याने आरोग्य केंद्र उभारणे गरजेचे आहे. गरजेनुसार आरोग्य केंद्र नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. नव्याने आरोग्य केंद्र उभारतांना नव्याने पदनिर्मिती देखील करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीमध्ये या नव्या पदाचा समावेश करण्यात आला आहे. शासनाकडून या प्रस्तावांना अजूनही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या मंजूरीला आता कधी मुहूर्त मिळणार असा प्रश्‍न आहे.

मध्यतंरी तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला मान्यता देण्यात आली होती. परंतू त्या इमारतीचे कामे अद्यापही पूर्ण झाली नाही. त्यासाठी निधी उपलब्ध झाला होता. परंतू त्या निधीत या आरोग्य केंद्रांची कामे पूर्ण होत नसल्याने वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे. तो निधी अद्याप मिळालेला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)