माढ्यात इच्छुकांची नव्याने तयारी

गटबाजी रोखण्यासाठी संजीवराजेंच्या उमेदवारीसाठी फलटणकर आग्रही

फलटण – माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जाहीर केलेली उमेदवारी मागे घेतलेली आहे. या जागेवर एक सुसंस्कृत, संयमी व दांडगा जनसंपर्क असणारे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देऊन पक्षातील गटबाजी रोखावी अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, खा. पवार यांच्या निर्णयानंतर मोहिते-पाटील पुन्हा तयारीला लागले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळीमध्ये मोठ्या प्रमाणावर गटतटाचे राजकारण चालते. यामध्ये प्रामुख्याने खा. विजयसिंह मोहिते पाटील, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व जि. प. अध्यक्ष संजयमामा शिंदे व करमाळ्याच्या रश्‍मी बागल तसेच सांगोल्याचे माजी आमदार तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिपकआबा साळुंखे यांच्यातील वाद संपूर्ण मतदारसंघाला माहिती आहे. मोहिते-पाटील गटाला उमेदवारी दिली गेली तर शिंदे व बागल व साळुंखे निवडणुकीत कितपत सक्रिय राहणार हा प्रश्न आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली गेली तर त्यांच्याविरोधात भाजपाकडून संजयमामा शिंदे लढणार असण्याची चर्चा आहे. दोघांमधील वाद राष्ट्रवादीला परवडणारा नाही. ही बाब शरद पवार यांनी लक्षात घेऊन गटबाजीशी संबंधित नसणारे आणि मोहिते पाटील, सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख माढ्याचे आ.बबनदादा शिंदे तसेच संजयमामा शिंदे, रश्‍मीताई बागल व माजी आ.दिपकआबा साळुंखे या गटाबरोबर निकटचे व मित्रत्वाचे संबंध ना. रामराजे ना÷ईक-निंबाळकर यांचे धाकटे बंधु संजीवराजे यांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

सध्या खा. विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा तयारी चालवली आहे. पर्याय म्हणून त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे समोर येत आहे. मोहिते-पाटील यांना तिकीट मिळणार असल्याचे समजून समर्थक तयारीला लागले आहेत. दुसरीकडे मोहिते पाटील यांच्याविरोधात भाजपाकडून सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे उभे राहणार असल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत मोहिते-पाटील गटाचा उमेदवार निवडून येणार नाही, यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसापूर्वी टेंभुर्णी येथे संजय मामाच्या मळ्यात माढा मतदार संघातील दिग्गज मान्यंवरानी उपस्थिती दाखविली होती. माढा लोकसभेचे गणित यावेळी त्यांनी नव्याने मांडले जाण्याची दाट शक्‍यता असल्याचे समजते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निर्णयाकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. पवार कसल्याही परिस्थित माढ्याची सीट निवडून येण्यासाठी योग्य असाच निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)