महाळुंगे इंगळे – पुणे – नाशिक महामार्गावर कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीत इंदायणी काठी पुलाजवळील तीन ते चार दिवसांचे स्री जातीचे नवजात बेवारस अर्भक प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळून कापडी बाळूत्यात आणून ठेवल्याचे आढळले. या अर्भकाची प्रकृती ठणठणीत आहे.
कुतुब अलीसाफ शेख (वय 35, रा. सद्गुरुनगर, भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शेख हे आयआरबी रस्ते कंपनीचे सुपरवायझर म्हणून काम पाहत आहेत. मंगळवारी (दि. 18) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांचे कामगार शिवाजी किसन कड (रा. संतोषनगर, भाम-वाकी, ता. खेड) यांनी या घटनेची माहिती दिली. इंद्रायणी काठी एका नवजात स्री जातीचे अर्भक बेवारस असल्याचे सांगण्यात आले. शेख यांनी तातडीने घटनास्थळावर जाऊन खात्री केली असता तीन ते चार दिवसांपूर्वी जन्मलेले स्री जातीचे नवजात अर्भक प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळून कापडी बाळूत्यात आणून ठेवलेले दिसले. त्यांनी चाकण पोलिसांना कळविले. चाकण पोलिसांनी संबंधित बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, हे नवजात बाळ याठिकाणी कोणी आणून ठेवले. या भागातील दवाखान्यामध्ये कोण महिला बाळंतपणासाठी आली होती का, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.