व्यक्तिमत्व : वर्ष नवे, नाविन्य हवे

-सागर ननावरे

आयुष्याच्या पुस्तकातील उद्या आणखी एक पान पलटले जाणार आणि नव्या पानावर नव्या आकांक्षांसाठी नव्याने मनाची लेखणी सज्ज होणार. समोर आलेल्या त्या कोऱ्या पानावर काय लिहायचे, याचे उत्तर अनेकांकडे नसणार. कारण “उद्याची फिकीर कशाला? आजचे आज बघू. ” अशा अविर्भावात अनेक ध्येयहीन व्यक्तिमत्त्वे उद्या एन्जॉय करण्यावर लक्ष केंद्रित करतील.

तर याउलट काही ध्येयवेडी व्यक्तिमत्त्वे मात्र पुन्हा नव्या उमेदीने नव्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी सज्ज होणार. त्या कोऱ्या पानावर कर्तृत्वाची मुद्रा उमटवून आयुष्यात नवा इतिहास घडविण्याचा त्यांचा मानस असणार.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्यक्तिपरत्वे नववर्ष संकल्पांचा अर्थ आणि आणि त्याचा अन्वयार्थ तसा वेगवेगळाच. वरील माझ्या म्हणण्याप्रमाणे सांगायचे झाल्यास उत्तर थोडेसे काव्यमय असेल. थोडक्‍यात नववर्ष आणि संकल्पाबद्दल बोलायचे झाल्यास,

“नववर्ष म्हणजे काय असतं?
“कुणा हाती ध्येय असतं
तर कुणा हाती पेय दिसतं
यश अपयशाच्या रेषेवरचं
अवघड एक प्रमेय असतं.”
थोडक्‍यात काय, तर हे संकल्प म्हणजे ज्याच्या त्याच्या मनाचा स्वतःचा मानस.

मुळात नवे वर्ष म्हटले की मानवाच्या नव्या अशा अपेक्षांना नव्याने धुमारे फुटत असतात. गेल्या वर्षाला निरोप देऊन झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे म्हणत पुढच्या प्रवासाचा प्रारंभ होत असतो. नवे वर्ष म्हटल्यावर आपण नक्कीच नव्या नवलाईने नव्या ध्येयधोरणांची आखणी करायलाच हवी. नवे संकल्प अंगीकारून स्वतःसमोर नवी आव्हाने ठेवता आली पाहिजेत. आणि पुढे या आव्हानांचा सामना करून त्यावर मात करून संकल्पसिद्धीचा आनंद घेता आला पाहिजे.
परवा पासून नवे वर्ष सुरू होणार. तुम्ही प्रत्येकाने अनेक योजना, संकल्प नक्कीच आखले असणार. परंतु याबरोबरच आपल्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देणाऱ्या काही गोष्टीही आपल्याला या नववर्षात अंगीकारायच्या आहेत.

चला तर मग सुरुवात करूया…

1. गतवर्षातून बोध घ्या : पाहता पाहता 2018 हे वर्ष संपले. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात या वर्षी सुख-दुख, यश-अपयश,आनंद,उत्साह, संधी,निराशा यांसारख्या गोष्टी आल्या असतील. काही गोष्टींतून आनंद मिळाला असेल, तर काहींतून निराशाही झाली असेल. परंतु आता या चांगल्या- वाईट अनुभवांतून आणि आठवणींतून आपल्याला बोध घ्यायचा आहे. झालेल्या चुका दुरुस्त करून यश मिळवायचे आहे.

2. सतत आनंदी राहा. आनंद ही अशी गोष्ट आहे, जी दिल्याने वाढते. आणि म्हणूनच येणाऱ्या 2019 मध्ये आनंद वाटायला शिका. त्याचप्रमाणे आनंद शोधायला शिका. आनंदात राहिल्याने मेंदूला पुरेसा ऑक्‍सिजन मिळून ताजेतवाने वाटते व क्रियाशीलता वाढते. आणि क्रियाशील राहिल्याने यश मिळवणे अधिक सुकर होते.

3. विश्‍वास निर्माण करा: आपल्या आयुष्यात विश्‍वासाला खूप महत्त्व आहे. प्रथम आपला आपल्यावर ठाम विश्‍वास असायला हवा. कारण स्वतःवर विश्‍वास असणं ही यशस्वी होण्याच्या मार्गातील पहिली पायरी आहे. आणि त्यानंतर लोकांत आपल्याला आपल्या आचारातून आणि विचारांतून विश्‍वास देता आला पाहिजे.

4. आरोग्यावर लक्ष द्या. असे म्हणतात, “सर सलामत तो पगडी पचास’. जर आपण शारीरिक सुदृढ आणि सशक्त असू, तर आपण मानसिक दृष्ट्याही खंबीर बनत जातो. चांगले आरोग्य हे आपल्या सवयींवर अवलंबून असते. त्यापैकी काही सवयी जर आपल्या दिनचर्येचा भाग बनल्या तर त्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम होऊ शकतात. म्हणूनच व्यायाम, योगा, प्राणायाम किंवा इतर कोणत्याही आरोग्यदायी कृती या केवळ डायरीत न लिहिता त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा.

5. ध्येयसिद्धीचा संकल्प करा. यशस्वी होण्यासाठी ध्येय ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ध्येय ठरविणे, त्याबाबत अभ्यास करणे, त्यानंतर कृतीत उतरविणे आणि ध्येय प्राप्त करणे याबाबत सुयोग्य नियोजन करा. कोणत्याही कारणास्तव आखलेले ध्येय अर्धवट सोडून देऊ नका. कारण ध्येयवेडी माणसेच ध्येय आखतात आणि ध्येयाने प्रेरित होऊन इतिहास घडवितात.

6. विचारात इनोव्हेशन आणा. आपल्यावर सोपविलेले एखादे जबाबदारीचे काम करताना किंवा दैनंदिन आयुष्य जगताना विचारात इनोव्हेशन,कल्पकता आणा. कामातील आणि विचारांतील तोचतोचपणा झटकून त्याला नावीन्याची जोड द्या. चाकोरीबद्ध विचारांतून बाहेर येऊन तुमच्यातील इनोव्हेशन जगासमोर आणा. कारण तुमचे इनोव्हेशन, कल्पकता ही जगासमोर तुमचे वेगळेपण सिद्ध करीत असते.

7. ज्ञानात सातत्य ठेवा: जितकी आपल्या ज्ञानात भर पडेल, तितके आपले जीवन सुकर बनत असते. ज्ञान हे अमर्याद आहे. त्यामुळे ज्ञानात सातत्य ठेवा. सातत्याने नवनवीन गोष्टी शिकत राहा. आपल्याजवळील ज्ञान इतरांना वाटून त्यांचे आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न करा.
आपल्या व्यक्तिमत्त्वाला खुलविणाऱ्या वरील सात गोष्टींना 2019 मध्ये नक्कीच जीवनात अजमावून पहा.

तुम्हा सर्वाना येणारे नवे वर्ष यशाचे, आनंदाचे, सुखाचे, भरभराटीचे आणि संकल्पसिद्धीचे जावो हीच प्रभात परिवाराकडून नववर्षाची शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)