न्यू विंडो : रक्त कॉंग्रेसचं; पण…

-भागा वरखडे
warkhade.bhaga@gmail.com

पद्मश्री विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे तरुण आहेत. त्यांच्याकडून पोक्तपणा तसा अपेक्षितही नाही, म्हणा! गेल्या एक वर्षापासून ते लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या घटनादत्त अधिकाराबाबत कुणाचंच काही म्हणणं असायचं कारण नाही; परंतु राजकीय नेत्याचं एखादं विधान वास्तवतेच्या कसोटीवर टिकतं का, हे जेव्हा पाहण्याची वेळ येते, तेव्हा भ्रमनिरास होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजकीय नेत्यानं भावनेच्या भरात एखादं विधान केलं, की तेच नंतर वादाचं होतं. डॉ. विखे नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करीत आहेत. हा मतदारसंघ दोन्ही कॉंग्रेसच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी 38 मतदारसंघाचं जागावाटप झाल्याचं दोन्ही कॉंग्रेसचे नेते सांगतात. नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह सर्वंच नेत्यांनी नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीनं कॉंग्रेससाठी सोडावा, असा आग्रह धरला आहे. राष्ट्रवादी अजून त्याला तयार नाही. उलट, आ. अरुण जगताप यांची उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीनं विखे यांची अडचण करून ठेवली आहे.

आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांना अडचणीत आणण्याची एकही संधी बाळासाहेब, राधाकृष्ण या विखे पितापुत्रांनी सोडली नव्हती. राष्ट्रवादीचं सर्वांधिक नुकसान विरोधी पक्ष किंवा अन्य कुणी करण्यापेक्षा विखे यांनीच केलं, हे वेगळं सांगायला नको. पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम, राज्य सहकारी बॅंक, वाढलेलं कथित सिंचन क्षेत्र आदी मुद्‌दयांवरून पवार यांना कोंडीत पकडण्याचं काम विखे यांनी केलं.

राष्ट्रवादीची नगर जिल्हा परिषदेतील आणि जिल्हा बॅंकेतील सत्ता जावी, यासाठी विखे यांनी केलेल्या विधिनिषेधशून्य तडजोडी राष्ट्रवादीचे नेते विसरले नसतील. विशेषतः यशवंतराव गडाख, शंकरराव गडाख, मारुतराव घुले, चंद्रशेखर घुले, बिपीन कोल्हे, शंकरराव काळे, अशोक काळे, सुजीत झावरे, वैभव पिचड, भानुदास मुरकुटे, प्रसाद तनपुरे आदी नेते तर नक्कीच विसरले नसतील. यातील काही नेते आता हयात नसले, तरी त्यांनी विखे यांच्याकडून घडविलेला पराभव कायम अंतर्मनात कायम ठेवला असेल.

या पार्श्‍वभूमीवर नगर लोकसभा मतदारसंघाचा निर्णय दोन्ही कॉंगेसमध्ये व्हायचा आहे. उमेदवारी मिळाल्यावर अचानक तयारी नको, म्हणून डॉ. विखे करीत असलेल्या तयारीचं कौतुक करायला हवं. नगर लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांची भूमिपूजनं, उद्‌घाटनं ते करतात. खरं तर पंचायत समित्यांनी किंवा कॉंग्रेसच्या सदस्यांच्या कामांची भूमिपूजनं करण्याचा विखे यांना तसा अधिकार आहे का, हा औचित्याचा मुद्दा आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांना भूमिपूजनं करण्याचा, उद्‌घाटनाचा अधिकार जरूर आहे; परंतु सुजय विखे यांना तसा तो नाही. तरीही त्यांनी अशा उद्‌घाटनांचा, भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. त्यातही नगर तालुक्‍यातील खडकी येथे बोलताना त्यांनी परस्परविसंगत विधान केलं.

कॉंग्रेस आपल्या रक्तात आहे, असं सांगताना कॉंग्रेसनं उमेदवारी दिली नाही, तर बंडखोरी करून निवडणूक लढविण्याचं सूतोवाच त्यांनी केलं आहे. कॉंग्रेस आपल्या रक्तात आहे, की बंडखोरी हे डॉ. विखे यांनी स्पष्ट करून सांगितलं असतं, तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं. तसं न करता त्यांनी केलेलं परस्परविसंगत विधान आता चर्चेचं ठरलं नसतं, तरच नवल.

रक्तात कॉंग्रेस आहे, की बंडखोरी याचा मागोवा घेतला, तर बंडखोरीच जास्त दिसेल. बाळासाहेब विखे यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापासून राजकीय कारकीर्द पाहिली, तर कॉंग्रेसनंही त्यांच्यावर अन्याय केल्याचं दिसतं. याचा अर्थ त्यांनी पक्षद्रोह करावा, असा होत नाही. विखे स्वतः ला सच्चे कॉंग्रेसवाले म्हणायचे; परंतु शंकरराव चव्हाण यांच्या महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेसमध्ये ते होते. त्यांचे मावसभाऊ अण्णासाहेब म्हस्के यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडून आणलं होतं, हे विसरता येणार नाही. राजीव गांधी यांच्या काळातही त्यांनी इंदिरा कृतीशिल विचारमंच स्थापन केला होता.

देशपातळीवरील काही खासदारांना एकत्र आणून पक्षांतर्गत विरोधी मोहीम सुरू केली होती. त्यामुळं तर त्यांना उमेदवारी नाकारली होती. एकीकडं कॉंग्रेसचे निष्ठावंत म्हणायचे आणि त्याचवेळी शंकरराव काळे यांना लोकसभेसाठी पराभूत करताना भाजपच्या भीमराव बडदे यांना सर्वतोपरी मदत करायची, याला कॉंग्रेसचं रक्त म्हणायचं, की बंडखोरी? कॉंग्रेसच्या यशवंतराव गडाख यांच्याविरोधात नगर लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करून निवडणूक लढवून बाळासाहेबांनी आपलं उपद्रवमूल्य दाखवून दिलं होतंच. कॉंग्रेसला बाळासाहेबांचं हे उपद्रवमूल्य आणि पाडा-पाडीचं राजकारण माहीत होतं, म्हणून बाळासाहेबांना कॉंग्रेसनं कधीच मंत्री केलं नाही.

लोकलेखा समिती, अर्थ समिती अशा समित्यांवर घेतलं; परंतु मंत्रिपदापासून दूर ठेवलं. त्यांना मंत्रिपदाची पहिली संधी दिली, ती शिवसेनेनं. अर्थराज्यमंत्रिपद, अवजड उद्योग मंत्री अशा मंत्रिपदाची संधी मिळूनही नंतर भाजप-शिवसेनेची सत्ता येत नाही, असं लक्षात आल्यानंतर बाळासाहेबांनी शिवसेनेचा त्याग करून कॉंग्रेसची वाट धरली, हा इतिहास कुणी कसं विसरेल? डॉ. विखे यांच्या आजोबांकडं बंडखोर वृत्ती होती. तसे दुसरे आजोबा नामदेवराव परजणे आयुष्यभर शंकरराव कोल्हे यांचे सच्चे कार्यकर्ते म्हणून राहिले; परंतु त्यांनाही व्याही आणि जावईप्रेमाखातर शिवसेनेत जावं लागलं. त्यांनीही कोपरगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविली. त्यांचा थोडया मतांनी पराभव झाला, हा भाग वेगळा.

राधाकृष्ण विखे पहिल्यांदा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून निवडून आले. विधिमंडळात त्यांची भाषणंही चांगली होतं; परंतु अवघ्या दीड वर्षात त्यांनी कॉंग्रेसच्या आमदारकीचा त्याग केला. शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. कृषिमंत्री म्हणून त्यांचं कामही चांगलं होतं. 1999 ला शिवसेना-भाजपची सत्ता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा कॉंग्रेसची वाट धरली. ज्या पक्षात राहायचं, त्याच्याच विरोधात आघाडी उघडायची, ही विखे यांची नीती होती. कॉंग्रेसमध्ये राहूनही त्यांनी जिल्हा विकास आघाडीचं अस्तित्त्व कायम ठेवलं होतं.

बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात विरोधी पक्षाचा उमेदवार ठरवण्यापासून त्याला प्रचारासाठीची रसद पुरवण्यापर्यंत कोण पुढाकार घेत होतं, हे कदाचित सुजय यांनाही माहिती असेल. अशोक भांगरे कॉंग्रेसचे; परंतु उमेदवारी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पक्षांची, तरी त्यांना लोणीची मदत कशी व्हायची, हे वेगळं सांगायला नको. वसंतराव झावरे, सुजीत झावरे यांच्याविरोधात नंदकुमार झावरे व त्यानंतर विजय औटी यांना अप्रत्यक्ष मदत कशी व्हायची, हे पारनेरकर अधिक चांगलं सांगू शकतील.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनेलशी युती करणं हे कॉंग्रेस संस्कृतीत कसं बसतं, याचं उत्तर सुजय यांनी द्यायला हवं. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीच्या अगोदर गोपीनाथ मुंडे असते, तर त्यांच्या हाताला धरून भाजपत जाण्याच्या राधाकृष्ण विखे यांच्यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्याच. सध्या राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते असले, तरी ते त्यांच्या कार्यालयात असण्योपक्षाही मुख्यमंत्र्यांकडंच जास्त वेळ असतात आणि मुख्यमंत्र्यांना लोणीला कार्यक्रमाला आवर्जून बोलवतात, हे कोणत्या पक्षनिष्ठेत बसतं? शिवसेनेवर जहरी टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेचा सूर कमी का लागतो, याचं उत्तर कुणाकडं आहे?

राहुरीत दोन्ही कॉंग्रेसची उमेदवारी प्राजक्त तनपुरे यांना मिळणार आहे. असं असताना विखेंची फौज खरंच त्यांना मदत करणार आहे का? सुभाष पाटील यांच्यासह अन्य नेते तर आताच शिवाजीराव कर्डिले यांच्या कच्छपी लागले आहेत.
विखे यांची फूस असल्याशिवाय हे शक्‍य आहे का? कॉंग्रेस रक्तात असून चालत नाही, ते वागणुकीतून दिसावं लागतं. ते तसं दिसत नाही. त्यामुळे डॉ. विखे यांचं वक्तव्य कॉंग्रेस माझ्या रक्तात आहे, हे विधान अर्धवट वाटतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)