नवीन पटनायक सलग पाचव्यांदा ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदी

भुवनेश्वर – ओदिशा विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवलेल्या बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक सलग पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसोबतच पार पडलेल्या ओदिशा विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाने पुन्हा एकदा सत्ता काबिज केली आहे. त्यानंतर सलग पाचव्यांदा नवीन पटनायक यांनी ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा शपथविधी सोहळा आज भुवनेश्वर येथे संपन्न झाला.

ओदिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी नवीन पटनायक यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी त्यांच्या नव्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. राज भवनाऐवजी मोकळ्या मैदानात 73 वर्षीय नवीन पटनायक यांच्या शपथविधीचा सोहळा रंगला.

10 नवीन चेहऱ्यांना संधी
याप्रसंगी राज्यपाल गणेशी लाल यांनी 11 कॅबिनेट आणि 9 जणांना मंत्रीपदाची शपथ दिली. पटनायक यांच्या मंत्रीमंडळात 10 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच ओदिशा विधासभेच्या सभापतीपदी ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री एस. एन. पेट्रो यांची निवड करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदींचा करिश्‍मा चाललेला दिसत असताना ओदिशामध्ये मात्र पुन्हा एकदा नवीन पटनायक यांनाच जनतेने कौल दिला आहे. मोदी लाटेतही बिजू जनता दलाने 112 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे नवीन पटनायक सलग पाचव्यांदा ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत.

या शपथविधी सोहळ्याला शेकडो बीजेडी कार्यकर्ते, उद्योग आणि अन्य क्षेत्रातील नामांकीत व्यक्ती तसेच राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी उपस्थित होते. पटनायक यांची बहिण गीता मेहता प्रसिद्ध लेखिका असून त्या सुद्धा शपथविधी सोहळ्याला उपस्थित होत्या.

ओदिशामध्ये विधानसभेच्या एकुण 147 जागा आहेत. त्यापैकी 146 जागांवर यंदा निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या आहेत, तर कॉंग्रेसला 9 जागांवर विजय मिळाला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ओदिशामध्ये बिजू जनता दलास 117, कॉंग्रेसला 16 आणि भाजपला 10 जागा मिळाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)