नव्या पाकिस्तानच्या जुन्या कुरापती सुरूच

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने घेतलेली असताना पाकिस्तान मात्र हे मानावयास तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे. भारताने दिलेले पुरावे हे अपुरे असल्याचे पाकिस्तानने म्हंटले आहे. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र खात्याने यावर निराशा व्यक्त केली आहे.

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या सहभागाबद्दल आणि सीमापार असलेल्या   पाकिस्तानमधील दहशतवादी शिबिराची आणि त्यांच्या नेतृत्वाची विस्तृत माहिती पाकिस्तानला देण्यात आली होती. परंतु पाकिस्तानकडून मिळत असलेल्या प्रतिक्रियेवर आज परराष्ट्र खात्याने निराशा जाहीर केली आहे.

२००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर किंवा २०१६ मध्ये झालेल्या पठानकोट दहशतवादी हल्ल्यांनंतर ज्याप्रमाणे पाकिस्तान कडून सांगण्यात येत होते, पुन्हा तेच पाढे यावेळी देखील वाचत असल्याचे परराष्ट्र खात्याने म्हंटले आहे. तसेच मसूद अझहर हा पाकिस्तानमध्येच असून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी परदेशी माध्यमांसमोर हे मान्य देखील केले असल्याचे भारताच्या परराष्ट्र खात्याने नमूद केले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान मधील दहशतवाद्यांचे हात असल्याचे भक्कम पुरावे भारताकडून देण्यात आले होते. दहशतवादी शिबिराची माहिती देखील देण्यात आली होती. त्यावर पाकिस्तानने यामध्ये तथ्य नसल्याचे म्हणत भारताने अधिक पुरावे द्यावेत अशी मागणी पाकिस्तान कडून करण्यात आली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)