जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही : गिरीश बापट

पुणे – गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात जातीपातीचे गलिच्छ राजकारण मी कधीच केले नाही. कार्यकर्ता हीच माझी ओळख आणि ताकद आहे, असे प्रतिपादन लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी गुरुवारी केले.

गिरीश बापट यांच्या समर्थनार्थ ताडीवाला रोड येथील महात्मा फुले शाळेच्या प्रांगणात भारतीय दलित कोब्रा संघटनेचा मेळाव्याचे संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट भाई विवेक चव्हाण यांनी आयोजन केले होते. यावेळी नगरसेवक उमेश गायकवाड, दीपक पोटे, महेश लडकत आदी उपस्थित होते.

पुढच्या पाच वर्षांत आपला खासदार कोण असणार हे ठरवणारी ही निवडणूक असणार आहे. दैनंदिन जीवनात आपण निरखून पारखून व्यवहार करतो. हीच पारख लोकप्रतिनिधी निवडतानाही आपण करायला हवी. आमच्या सरकारने गरीबांच्या कल्याणाच्या अनेक योजना आणल्या, दुसरीकडे विरोधकांनी मात्र आजपर्यंत लोकांना खोटी आश्वासने दिली. सर्वसामान्यांची कामे करताना आम्ही कधी त्याची जातपात पहिली नाही. पण विरोधक मात्र माझ्या जातीवरून राजकारण करत आहेत, अशी टीका बापट यांनी केली.

राष्ट्रवादी हा छुपा जातीयवादी पक्ष
राष्ट्रवादी कॉंग्रेस हा जातीयवादी पक्ष आहे. एकेकाळी राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला हा पक्ष आता स्थानिक पातळीवर आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणारा हा पक्ष नावात राष्ट्रवाद असून छुपा जातीयवादी आहे, अशी टीका महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत स्वराज्य स्थापनेसाठी मोलाची कामगिरी बजावलेल्या पुण्यातील सरदार घराण्यांचा वंशजांचा कोथरूड येथे मेळावा झाला. यात सरदार घराण्यांनी पुणे शहर लोकसभा मतदार संघातून बापट तसेच बारामती मतदार संघातून कांचन कुल यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दर्शविला.

विरोधक शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जातीय राजकारण करत आहेत. महाराजांचे नाव आम्ही घेतल्यावर यांच्या पोटात का दुखते? असा सवालही बापट यांनी उपस्थित केला. जातीयवाद ही समाजाला लागलेली कीड आहे. जातीय प्रवृत्तीमुळे देशाचे नुकसान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांची मात्र यांनी जात काढली, अशी टीका बापट यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)