नेट मीटरचे दर महावितरणकडून निश्‍चित

संबंधित रक्कमच ग्राहकांच्या बिलातून वळती होणार
पुणे- स्वखर्चाने नेट मीटर बसविलेल्या ग्राहकांना महावितरणने मीटरचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महावितरणकडून मीटरचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. तेवढी रक्कम संबंधित ग्राहकांच्या बिलातून वळती करून घेणार आहे.

राज्यातील सौरऊर्जा प्रकल्प उत्पादकांचा मेळावा नुकताच झाला. त्यामध्ये महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय लटपटे यांनी ही माहिती दिली. “रूफटॉप सोलर एनर्जी प्रकल्प’ राबविणाऱ्या ग्राहकांना महावितरणने नेट मीटर उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. परंतु, महावितरणकडून राज्यातील एकाही ग्राहकाला हे नेट मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही. परिणामी ग्राहकांना बाजारातून ते विकत घेऊन बसवावे लागत होते. तसेच, बाजारातून मीटर खरेदी केल्यानंतर त्यांची तपासणी महावितरणने मोफत करून देणे अपेक्षित असताना, त्यासाठी सुद्धा शुल्क आकारले जात होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. सजग नागरिक मंचासह वीजग्राहक आणि संघटनांकडून या मीटरचे पैसे महावितरणने ग्राहकांना परत द्यावे, अशी मागणी केली जात होती. या पार्श्‍वभूमीवर महावितरणने हा निर्णय घेतला आहे.

ज्या ग्राहकांनी स्वखर्चाने नेट मीटर बसविले आहेत. त्यांना मीटरचे पैसे परत करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यासाठी या नेट मीटरचा दर महावितरणकडून निश्‍चित करण्यात आला आहे. तेवढी रक्कम संबंधित ग्राहकांच्या बिलातून वळती करून घेण्यात येणार आहे. याशिवाय नेट मीटर तपासणीसाठी आकारण्यात आलेले शुल्क देखील परत केले जाणार आहे. – संजय लटपटे, अधीक्षक अभियंता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)