#लक्षवेधी: संवेदनाहीन लोकप्रतिनिधींना ध्वजवंदनापासून रोखावे

जयेश राणे

मेजर कौस्तुभ राणेंसारख्या वीर सैनिकास निरोप दिल्यावरही दु:खद घटनेतून सावरण्यास कुटुंबाला नक्‍कीच वेळ लागणार आहे. देशवासीयांच्या रक्षणासाठीच स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या लढवय्या सैनिकाविषयी किंचितही कृतज्ञता नसणाऱ्यांना लोकप्रतिनिधी कसे, का म्हणावे? याचा जाब शहिदाच्या घराजवळच जल्लोषात सहभागी झालेल्या प्रत्येकाला खडसावून विचारलाच पाहिजे.

काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेले मेजर कौस्तुभ राणे यांना 9 ऑगस्ट 2018 रोजी लष्करी मानवंदनेसह भारतमातेच्या जयघोषात अत्यंत सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. पण तत्पूर्वी एक लाजीरवाणी गोष्ट घडली. त्याकडे लक्ष वेधणे अत्यावश्‍यक वाटते. त्यावरून आपल्या देशात कोणत्या प्रकारच्या व्यक्ती रहातात, हे लक्षात येईल. हुतात्मा राणे यांच्या घराशेजारी (मीरारोड, जि. ठाणे) हाकेच्या अंतरावर आमदार, महापौर यांच्या उपस्थितीत डीजेचा दणदणाट करत भाजपा नगरसेवकाने मोठ्या जल्लोषात (आलिशान मंडप, मेजवानी) वाढदिवस साजरा केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या देशातले लोकप्रतिनिधी नेहमीच असे गेंड्याची कातडी पांघरलेले संवेदनाहीन व्यक्ति कसे काय असतात, हाच प्रश्‍न प्रत्येक जण अत्यंत संतापाने एकमेकाला विचारत आहे. हे कथित लोकप्रतिनिधी आणि त्यांचे चेले हे भारताचे नागरिक नाहीत काय, अशी प्रतिक्रियाही उमटली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिनांक 6 ऑगस्टच्या रात्री काश्‍मीरच्या गुरेज सेक्‍टरमध्ये लढताना चार सैनिक हुतात्मा झाले होते. त्यात मेजर राणेही होते. दिनांक 7 ऑगस्टला याची माहिती मिळाली. त्याच दिवशी राणे यांच्या घरी नागरिक सांत्वनासाठी येत होते. त्याच दिवशी नगरसेवक आनंद मांजरेकर यांनी धुमधडाक्‍यात वाढदिवस साजरा केला. राणे यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनाला उपस्थित राहिलेले आमदार नरेंद्र मेहताही सहभागी झाले होते. जे चुकले आहेत त्यांच्यावर टीका ही होणारच.

आपल्या देशात शेजारच्या घरामध्ये दु:खद घटना घडली की आपसूकच अन्य शेजारीही त्यांच्या दु:खात सहभागी होतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रांत एखाद्या गावातला जवान शहीद झाल्यास त्या गावात तर साधी चूलही पेटत नाही; शिवाय संपूर्ण पंचक्रोशी त्या दु:खात सहभागी होत असते.

मात्र, येथे काही वेगळाच प्रकार नागरिकांनी “याची देही याची डोळा’ अनुभवला. भारतीय सैन्यातील एक युवा अधिकारी शत्रूशी लढताना हुतात्मा झाल्याचे कळल्यावर गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि परिसर शोकाकुल आहे. देशावर आणि हाकेच्या अंतरावर रहाणाऱ्या राणे कुटुंबावर अत्यंत दु:खद प्रसंग कोसळला असताना धांगडधिंगा करण्याचा निर्लज्जपणा केला जाऊ शकतो, तर “मी असे का केले?’ याविषयी बोलताना वाचा बसण्याचे कारण असण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. हे मेजर राणे यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाने पाहिले आहे. एकजण चुकत आहे, तर त्याला त्याची तात्काळ जाणीव करून देणारे कुणीच नाही, याचे आश्‍चर्य वाटते. याचाच थेट अर्थ असा की अशा ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्वच एकाच माळेचे मणी होते, असे म्हणायचे का?

सीमेवर कित्येक सैनिक हुतात्मा होत आहेत. म्हणूनच तर त्यांच्या बलिदानानंतरही असले सोहळे करणारेही सुरक्षित रहात आहेत. अतिरेक्‍यांशी अहोरात्र संघर्ष करणे हे येरागबाळ्याचे कार्य नाही. त्यासाठी राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम हे अंगी भिनलेले असावे लागते. याची वानवा असलेले काय करतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच हा वाढदिवस साजरा करण्याचा लांच्छनास्पद प्रकार आहे. “आम्ही कसेही वागलो, काहीही बोललो तरी आमचे कोण काय करणार,’ या नशेची लोकप्रतिनिधींना असलेली धुंदी अशा प्रकारांमागे असते. थोडक्‍यात नागरिकांना गृहीत धरले जाते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या घडलेल्या निर्लज्ज प्रकाराविषयी समाजातून सडकून टीका झाल्यावर माफीचे नाटक पार पडल्यास ते उपयोगाचे आणि विश्‍वासार्ह असणार नाही. अशा कृतघ्नांना कुणीही माफ करणार नाही. “मी आणि माझे सुख’ या चौकटीत राहणाऱ्यांना राष्ट्रसेवा, लोकसेवा काय कळणार? किंबहुना तेवढी त्यांची पात्रताच (लायकी) नाही. एखाद्याच्या सुखात सहभागी होण्यास मिळाले नाही तरी चालेल. मात्र त्याच्यावरील कठीण प्रसंगात हातातील सर्व कार्य सोडून तात्काळ धावून जाता आलेच पाहिजे. तोच खरा “माणूस’ होय. आधी माणूस होणे शिकण्याची नितांत आवश्‍यकता असलेल्यांकडून प्रसंगावधान राखत आदर्श वर्तनाची अपेक्षा करणे म्हणजे अतिशयोक्तीच म्हणता येईल.

म्हणूनच ज्यांची नितीमत्ताच लयास गेलेली आहे, अशांना येत्या 15 ऑगस्टला राष्ट्रध्वजास मानवंदना करण्याचा नैतिक अधिकार आहे का? कुठे संकुचित वृत्तीचे प्रदर्शन करणारे निष्ठूर आणि कुठे, “देशाच्या रक्षणासाठी आणखी मुले असती तर तीही दिली असती,’ असे धिरोदत्तपणे म्हणणारे मेजर राणे यांचे पिता. सैनिकांचे पालकच केवळ असे बोलू शकतात. कारण त्यांनी देश रक्षणासाठी पुत्र अर्पण करण्याचा केलेला त्यागच त्यांना असे बोलण्याचे धाडस देतो. धाडसी माणसांचेच विचार, कार्य कायम स्मरणात रहाते. त्यांच्याच गोष्टींपासून प्रेरणा घेतली जाऊन देशासाठी नेत्रदीपक कार्य करण्यासाठी पुढील पिढी सिद्ध होत असते.

सैनिक हुतात्मा झाल्यावर त्याचे पार्थिव घरी पोहोचवेपर्यंत त्या सैनिकाचा मान सैन्याकडून कुठेही ढळू दिला जात नाही. ते कार्य किती शिस्तबद्ध,अचूकपणे पार पाडले जाते हे वेळोवेळी वृत्तवाहिन्यांवर देश पहात असतो. सैन्याची ती शिस्त जपण्याचा प्रयत्न हुतात्मा सैनिकाच्या परिसरातील नागरिकही आदरपूर्वक करत असतात. हे करत असताना प्रत्येकाचे अंत:करण भरून येते. शत्रूविषयी आग मनामध्ये जळत असते. अशा भरल्या अंत:करणानेच हुतात्मा सैनिकाला कायमचा निरोप दिला जातो. राष्ट्ररक्षण करून समाजऋण फेडणाऱ्या आमच्या सैनिकांना विनम्र अभिवादन आणि असंवेदनशील लोकप्रतिनिधींचा धिक्‍कार!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)