मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांचे होणार ऑडिट

“नीरि’च्या मदतीने महापालिका करणार तपासणी

पुणे – महापालिकेच्या 9 सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची तपासणी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था (नीरि) यांच्याकडून केली जाणार आहे. ही तपासणी करण्याचे आदेश नमामि चंद्रभागा प्राधिकरण समिती बैठकीत महापालिकेस देण्यात आले होते. त्यानुसार, दरवर्षी ही तपासणी करण्यासाठी “नीरि’ला 32 लाख रुपये दिले जाणार आहेत. मंगळवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत या खर्चास मान्यता देण्यात आली.

या तपासणीमध्ये शुद्धीकरण प्रकल्पांच्या यांत्रिक कार्यक्षमतेची तपासणी केली आहे. मुळा-मुठा नदीत थेट सांडपाणी सोडले जात होते. यामुळे या नद्यांसह हे पाणी पुढे उजनी धरण तसेच चंद्रभागेत जात असल्याने चंद्रभागा प्रदूषित झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यशासनाने “नमामि चंद्रभागा’ प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरण समितीदेखील नेमली आहे. या समितीने महापालिकेने 2001 नंतर शहरात उभारलेले सांडपाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालतात, की नाही? याचे “थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ही तपासणी महापालिकेने “नीरि’कडून करून घ्यावी, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार, पालिकेने “नीरि’ संस्थेस पत्राद्वारे 10 सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची तापसणी करण्याबाबत पत्र पाठविले होते. त्यास “नीरि’ने मान्यता दिली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)