नीरव मोदीची होळी तुरुंगातच

लंडन- हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल बॅंकेतील 2 अब्ज डॉलरच्या मनी लॉंडरिंग प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदी याला मंगळवारी इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर बुधवारी वेस्टमिन्स्टर न्यायालयाने त्याला जामिन नाकारला. त्यामुळे यंदाची होळी इंग्लंडच्या तुरुंगात काढावी लागली. न्यायालयाने नीरव मोदीला 29 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आणि त्यानंतर त्याला नैऋत्य लंडनमधील वॅन्डस्वर्थ कारागृह प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले होते. तब्बल 1,430 कैदी असलेल्या या तुरुंगात त्याला स्वतंत्र सेल मिळण्याची आशा आहे. मात्र तसे झाले तरी त्याची होळी मात्र तुरुंगातच गेली आहे.

इंग्लंडमधील प्रशासनाकडून नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी आवश्‍यक असणारी सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाला विलंब होणार नाही, असे भारतातील तपास संस्थांनी म्हटले आहे. “सीबीआय’ आणि “ईडी’कडून सादर करण्यात आलेले सविस्तर पुरावे ध्यानात घेऊनच नीरव मोदीला बुधवारी वेस्टमिन्स्टर येथील न्यायालयाने जामिन नाकारला, असे या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे.

मात्र 29 मार्च रोजीच्या सुनावणीसाठी इंग्लंडमधील न्यायालयाकडून “ईडी’ आणि “सीबीआय’ला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती कळवण्यात आलेली नाही. त्यामुळे या सुनावणीसाठी भारतीय अधिकाऱ्यांचे संयुक्‍त पथक पाठवायचे की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

नीरव मोदीचा भाऊ निहाल आणि बहिण पूर्वी हे देखील मनी लॉंडरिंग प्रकरणात अन्य आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात “ईडी’ आणि “सीबीआय’कडून पुरावे जमा केले जात आहेत. याशिवाय नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्‍सीला भारतात आणण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)