एक्‍झिट पोल मध्ये एनडीएचेच वर्चस्व

युपीए व अन्य प्रादेशिक पक्षांना अपेक्षित यश नाही

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यांचे पार पडल्यानंतर विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांनी आज जी एक्‍झिट पोलची आकडेवारी जाहींर केली आहे त्यानुसार देशात आता पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचेच सरकार पुर्ण बहुमत मिळवून सत्तेवर येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या चाचण्यांच्या निष्कर्षानुसार कॉंग्रेस प्रणित युपीए आघाडीला व अन्य प्रादेशिक पक्षांना अपेक्षित यश मिळण्याची शक्‍यता नाही. विशेषत हिंदी भाषीक पट्ट्यात भाजपचा करिष्मा कायम राहणार असल्याचेच संकेत या चाचण्यांमधून मिळाले आहेत.

उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना या राज्यात भाजपचीच लाट असल्याचे ही आकडेवारी दर्शवते. या राज्यांमध्ये जवळपास 2014 च्या निवडणुकीसारखीच भाजपची स्थिती राहील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या खेरीज भाजपने बिहार मध्येही आपले वर्चस्व कायम राखत ओडिशा, कर्नाटक, आणि पश्‍चिम बंगाल मध्ये आपल्या स्थितीत कमालीची सुधारणा केली असल्याचे अंदाजही यात वर्तवण्यात आले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने पहिल्यापासूनच आक्रमक प्रचाराचे धोरण राबवले होते. तसेच मोदींच्या प्रचार सभांचाही मोठा झंझावात यावेळी दिसून आला. त्यांना प्रत्येक सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर भाजपने आपला प्रभाव वाढवत नेला आणि विरोधकांवर प्रचारात मोठी मात केल्याचे दिसून आले होते.

आज झालेल्या एक्‍झिट पोल चाचण्यांमधून तेच संकेत मिळाले आहेत. निवडणूक पुर्व आघाडी करण्यातही भाजपने बाजी मारली होती. महाराष्ट्र, बिहार या सारख्या राज्यात काही वेळ पडती भूमिका घेऊन त्यांनी घटक पक्षांशी पक्की निवडणूक आघाडी केली. त्याचाही त्यांना यात लाभ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीला घवघवीत यश मिळताना दिसून येत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जेमतेम सात जागांचा लाभ या निवडणुकीत पदरात पाडून घेणे शक्‍य होणार असल्याचा या चाचण्यांचा निष्कर्ष आहे.

केवळ काही महिन्यांपुर्वीच मध्यप्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने मोठे यश मिळवत या तिन्ही राज्यांची सत्ता काबिज करून भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच नेस्तानबुत केले होते. तथापी त्यांना हा करिष्मा लोकसभा निवडणुकीत राखता आला नाही असे या निकालांवरून स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)