एनडीए सरकारचे धोरण दुटप्पी – विजय मल्ल्या

जेट विमान कंपनीला मदत केली तशी आमच्या विमान कंपनीला का केली नाही?

नवी दिल्ली – एनडीए सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी दुटप्पी धोरण अवलंबले असल्याचा आरोप फरारी उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे. त्याने म्हटले आहे की बुडालेल्या जेट विमान कंपनीला वाचवण्यासाठी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी त्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. अशी मदत आपल्या किंगफिशर एअरलाईन्सला का दिली नाही असा सवाल त्याने केला आहे. ट्‌विटरवर त्याने हा सवाल केला आहे.

जेट एअरवेज कंपनी भारतातील स्टेट बॅंकेने चालवायला घेतली आहे. तशी मदत त्यांनी किंगफिशर कंपनीलाही करायला हवी होती असे त्याचे म्हणणे आहे. जेट एअरवेज कंपनीला वाचवून त्यातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवण्याचा प्रयत्न चांगला आहे असा खोचक टोमणाही त्याने मारला आहे. आपण स्वत:ची तोशिष सहन करून किंगफिशर विमान कंपनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याला कोणीही मदत केली नाही. उलट जितके शक्‍य असेल त्या मार्गाने आपल्यावर टीकाच करण्यात आली. मी माझी विमान कंपनी आणि त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी चार हजार कोटी रूपये खर्ची घातले आहेत असे तो म्हणाला.

भाजपने किंग फिशर कंपनीला दिलेल्या वागणुकीबद्दलही त्याने टिकास्त्र सोडले आहे. युपीए सरकारच्या काळात मी तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लिहीलेली पत्रे वाचून दाखवून भाजपच्या प्रवक्‍त्याने युपीए सरकारच कसे किंगफिशर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करीत होते याचे दाखले देण्याचा प्रयत्न केला होता. मग आता हेच सरकार जेट एअरवेजच्या मदतीला कसे धावले असा त्याचा सवाल आहे. आपली मालमत्ता विकून भारतीय बॅंकांची रक्कम परत करण्याची आपली इच्छा आहे असे त्याने पुन्हा या ट्‌विटर संदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)