साध्वीला एनआयए कोर्टाचा दिलासा

निवडणूक लढवण्याविरोधातील याचिका फेटाळली

मुंबई – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. साध्वीच्या जामीनाला आव्हान देत तिला लोकसभा निवडणूक लढण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एखाद्या आरोपीला निवडणूक लढण्यापासून रोखणं हा निर्णय न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही. याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घ्यावा. नासिर बिलाल यांची ही याचिका कायदेशीरदृष्ट्या टिकणारी नाही, असे मत नोंदवत न्यायाधीश विनोद पाडाळकर यांनी नोंदविले आहे.

याचिकाकर्त्यांना कोणताही आर्थिक दंड न आकारता निव्वळ समज देण्यात आली आहे. मात्र तपासयंत्रणांना एनआयए कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत. “आम्ही साध्वीला क्‍लीन चीट दिलेली आहे, हे तुमच्या उत्तरात लिहायची काय गरज होती? यावर याचिकाकर्त्यांनी सवाल केलेला नव्हता. तसेच कोर्टाला आरोपांत काहीतरी तथ्य वाटले म्हणूनच साध्वीवर आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत, हे लक्षात ठेवा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना पाहायला मिळणार आहे.
“ही याचिका निव्वळ राजकीय हेतून प्रेरीत आहे. याचिकेतील मागणी आणि आरोपांत कोणतही तथ्य नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना मोठा आर्थिक दंड आकारावा, जेणेकरुन कोर्टाचा वेळ खाणाऱ्या अशा याचिका दाखल होणार नाहीत, असे उत्तर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने एनआयए कोर्टात सादर केले होते.

तर साध्वी प्रज्ञा यांनी निवडणूक लढवावी की लढू नये, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. हा निर्णय आमच्या अखत्यारीत येत नाही, असे उत्तर राष्ट्रीय तपास यंत्रणेने कोर्टात दिले होते. तसेही याआधीच आम्ही या प्रकरणांत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना “क्‍लीन चीट’ दिलेली आहे, आम्ही त्यावर आजही ठाम आहोत, असे एनआयएने कोर्टाला दिलेल्या आपल्या उत्तरात म्हटले होते.

साल 2008च्या मालेगाव ब्लास्टमध्ये मुलगा गमावलेल्या नासिर बिलाल यांनी एनआयए कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने साध्वी आणि तपासयंत्रणेला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंगळवारी या दोघांनी आपली उत्तर कोर्टापुढे सादर केले. ज्यावर बुधवारी (24 एप्रिल) सुनावणी घेत ही याचिका फेटाळून लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)