महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज नाही

खा. विखे : कुकडीचे कार्यालय महिनाभरात नगरला 

नगर – महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने शिवसेनेचे नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची गरज नाही. महापालिकेत सध्या भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती आहे. शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष आहे. जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी शिवसेनेबरोबर युती असावी, असा स्पष्ट खुलासा खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला. याबाबत काही मतभेद असतील, तर आपण स्थानिक पातळीवरील नेत्यांची संवाद साधू, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे खा. विखे म्हणाले.

खा.विखे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नगरसह राज्यात पाणी प्रश्‍नावरून वाद निर्माण करण्यापेक्षा हा प्रश्‍न समन्वयाने सोडविणे आवश्‍यक आहे. सरकारने गोदावरी जलआराखडा तयार केल्यानंतर बरेच प्रश्‍न समोर आली असून, ते सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करले. यासाठी पश्‍चिम खोऱ्यात वाहून जाणारे पाणी तुटीच्या खोऱ्यात आणणे आवश्‍यक आहे. तसेच पाण्याचा अग्रक्रम ठरविणे आवश्‍यक असून समुद्राला जाणारे 110 टिएमसी पाणी परत आणणे आवश्‍यक आहे. ज्या प्रमाणे राज्य सरकार बोगदे पाडून महामार्ग तयार करत आहेत, त्याच धर्तीवर बोगदे पाडून एकीकडून दुसरीकडे पाणी आणता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले असून, कुकडीचे 75 टक्के लाभक्षेत्र नगर जिल्ह्यात असल्याने कुकडीचे कार्यालय नगर जिल्ह्यात एक महिन्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

भाजप आणि केंद्र व राज्यातील युती सरकार आरोप करण्यापूर्वी आपण काय काम केले याचा विचार करावा. जिल्ह्यात सर्व मतदारसंघात युतीचाच मोठ्या मताधिक्‍याने विजय होईल, असा विश्‍वास व्यक्त करीत वल्गना करणाऱ्यांना लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या निकालातही अनुभव येईल, या शब्दात विखे यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. कुकडी प्रकल्पातील सत्तर टक्के पाणी नगर जिल्ह्याच्या हक्काचे आहे. कुकडीचे सर्वाधिक लाभक्षेत्रही नगर जिल्ह्यात आहे. ही वस्तुस्थिती असताना कुकडीचे मुख्यालय मात्र पुण्यात या विरोधाभासाकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले असून, कुकडी प्रकल्पाचे मुख्यालय नगरमध्ये हवे, अशी मागणी केली. त्यास मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल मिळाला असून, येत्या महिनाभरात कुकडी प्रकल्पाचे मुख्यालय नगरमध्ये येणार असल्याचे खा. विखे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)